जुन्नर –
मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मराठा आंदोलनातील मनोज जरांगे पाटलांचे अग्रेसर सहकारी सतीश देशमुख यांचे मुंबईकडे जाताना जुन्नरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. देशमुख हे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील वरडगावचे रहिवाशी होते. या घटनेमुळे आंदोलकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
अंतरवेलीतून अहिल्यानगरमध्ये जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा आंदोलक जुन्नरमध्ये दाखल झाले होते. आज (दि. २८) हा ताफा मुंबईकडे निघत असताना, सतीश देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आला. या घटनेनंतर त्यांना तातडीने जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी दाखल केले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, या घटनेमुळे मनोज जरांगे पाटील हे सुद्धा व्यथित झाले आहेत. मनोज जरांगे पाटील
म्हणाले की, आमचा देशमुख नावाचा बांधव प्रवासात असताना त्यांचा दम छाटला आणि त्यांना अटॅक आला. मी याबाबत अजूनही माहिती घेत आहे. परंतु ही घटना अत्यंत दुःखद आहे. याला जबाबदार फडणवीस साहेब आहेत. तुम्ही आता जर का आम्हाला आरक्षण दिले तर आमचे बळी जाणार नाहीत. आमचे आणखी दोन बळी घेतले आहेत. लातूरला परवाच्या दिवशी अशीच घटना घडली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

























