नाशिकरोड – विशेष प्रतिनिधी
वडनेर गेट, पिंपळगाव खांब परिसरात रक्षा बंधनाच्या पूर्वसंध्येला घराच्या अंगणात खेळणाऱ्या तीन वर्षीय आयुष किरण भगत बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू झाला होता. यामुळे संतप्त नागरिकांनी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. या प्रयत्नांना यश आले असून एक बिबट्या जेरबंद करण्यात यश आले आहे. मात्र जोपर्यंत परिसरात फिरणारे सर्व बिबटे पकडले जात नाही तोपर्यंत पिंजरे हलवू देणार नाही असा इशारा माजी नगरसेवक केशव पोरजे यांनी दिला आहे.
नाशिक रोड परिसरातील वडनेर गेट, पिंपळगाव खांब येथे रक्षा बंधनाच्या आदल्या दिवशी तीन-वर्षांच्या निरागस आयुषला बिबट्याने ओढून
नेले होते. ही घटना उघडकीस येताच नागरिक, वनविभाग तसेच पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने शोध कार्य राबवल्यानंतर नजिकच्या शेतात आयुषचा मृतदेह आढळून आला होता. या अत्यंत दुर्दैवी व संतापजनक घटनेने विहित गाव, दारणा सांगवी, चेहेडी, चाडेगाव, सामनगाव, हिंगणवेडा, एकलहरागाव व कॉलनी, जय भवानी रोड विहित गाव लहवित रोड, साकुर फाटा, राहुरी गाव सिन्नर तालुक्यातील गावे शहर परिसरातील वातावरणात भीतीचे सावट पसरले होते. तसेच शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र संताप होता. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्याचे नेतृत्व उपनेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख व परिसरातील माजी नगरसेवक केशव पोरजे, भय्या मणियार, योगेश गाडेकर, महिला जिल्हाप्रमुख स्वाती पाटील, मसूद शेख, शोभा वाडले, सागर निकाळे, बंटी कोरडे, माजी नगरसेविका सुनिता कोठुळे, निलेश कर्डीले, अश्विन पवार यांनी केले होते.
मोर्चेकऱ्यांनी मागील एका वर्षात नाशिक जिल्ह्यात वन विभागाने एकूण किती बिबटे पकडले, पकडलेले बिबटे कोणत्या जंगलात, कोणत्या तारखेस सोडण्यात आले, याबाबतची संपूर्ण नोंद (वाहनाचे लॉग बुक व किलोमीटर रेकॉर्डसह) तपासण्यात यावी, मागील वर्षभरात बिबट्यांच्या दर्शनाविषयी किंवा हल्ल्यांबाबत नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारींपैकी, बिबट्या पकडण्यात अपयश आलेल्या प्रकरणांची संख्या आणि मागील वर्षभरात बिबट्यांच्या हल्ल्यात किती जनावरे व नागरिक (विशेषतः लहान मुले) मृत्यूमुखी पडले, याची संख्या द्यावी, अशी मागणी केली होती.
तसेच, यापुढे जे बिबटे पकडले जातील त्यांना ‘जीपीएस’ चिप बसविण्याचे बंधनकारक धोरण अमलात आणावे, व जिल्हास्तरीय वन विभाग कार्यालयात ‘जीपीएस’ कंट्रोल रूम स्थापन करून त्यांचे हालचालीचे थेट निरीक्षण करावे. पकडलेले बिबटे मोठ्या जंगलातच सोडण्याचा शासन निर्णय काढावा, जेणेकरून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित होईल, अशी आग्रही मागणी केली. तेव्हा वनविभागाने सात दिवसात बिबट्यांना जेरबंद करण्याचे आश्वासन दिले होते. त्यातील एक बिबट्या हाती लागला असून इतर बिबट्यांचा शोध घेतला जात आहे. 
बिबट्यावर नियंत्रण मिळवताना…
वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना…






वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना…


















