नाशिक – विशेष प्रतिनिधी
आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २०२४ मध्ये अपहरण झालेल्या बालकाचा तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनिय माहितीच्या आधारे शोध घेण्यात शहर पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेला यश आले आहे. अपहृत बालक सूरत (गुजरात) शहरातील लाल दरवाजा परिसरात मिळून आला असून त्यास ताब्यात घेऊन आडगाव पोलिसांच्या सूपूर्द करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्हयातील अपहृत मुला/मुलींचा शोध घेण्याबाबत मध्यवर्ती गुन्हेशाखे अंतर्गत अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षास आदेश दिलेले होते. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त
किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांनी अपहृत मुला/मुलींचा आढावा घेवुन त्यांचा शोध घेणेसाठी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाकडील अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या.
अनैतिक मानवी वाहतुक कक्षाकडील अधिकारी व अंमलदार हे समातंर तपास करून अपहृत मुला/मुलींचा व मिसींग व्यक्तीचा शोध तांत्रीक विश्लेषणाद्वारे तसेच गोपनिय माहितीच्या आधारे शोध घेत होते. आडगाव पोलीस ठाणे गुरनं. १५७/२०२४ भादंविक ३६३, ३७० मधील अपहृत मुलगा हा पंधरा महिन्यापासुन मिळून आलेला नसल्याने त्याचा अधिकारी व अंमलदार हे शोध घेत असतांना गुन्हयातील अपहृत मुलगा हा गुजरात राज्यात असल्याबाबत गोपनिय माहिती मिळाली. सदरची माहिती वरिष्ठांना सांगून अपहृत मुलाचा शोध घेण्याकामी शोध पथक तयार करून सूरत (गुजरात) येथे जावुन पथकाने सदर ठिकाणी तपास केला असता अपहृत मुलगा हा सुरत शहरातील लाल दरवाजा परिसरात मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन पुढील कारवाईसाठी आडगाव पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, सहायक निरीक्षक विश्वास चव्हाणके, प्रविण माळी, उपनिरीक्षक बाळु गिते, हवालदार गणेश वाघ, वैशाली घरटे, अतुल पाटील, प्रजित ठाकुर, दिपक पाटील यांनी संयुक्तरित्या पार पाडली आहे.

























