नाशिक – विशेष प्रतिनिधी
पोलीस आयुक्तालयातील नाशिकरोड, उपनगर व देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या विविध गुन्ह्यातील ४९ लाख रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत देण्यात आला आहे. यामुळे फिर्यादींना दिलासा मिळाला आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून पोलिसांनी चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरी, सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी, सोने व चांदीचे दागिने चोरी आदी गुन्हयामध्ये चोरट्यांकडून
हस्तगत केलेला मुद्देमाल परत करण्यात आला. उपायुक्त किशोर काळे, सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबवण्यात आली.
नाशिकरोड पोलीस ठाण्यातील १४ गुन्हयामधील ३२ लाख १४ हजार रूपये किंमतीचा उपनगर पोलीस ठाण्यातील ११ गुन्हयांमधील १४ लाख १३ हजार रूपये किंमतीचा तर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील विविध गुन्हयामधील चोरी झालेला ३ लाख १८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल मुळ फिर्यादी यांना परत करण्यात आला.
याप्रसंगी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे, मुद्देमाल कारकून उपनिरीक्षक विलास कोटमे, हवालदार विष्णू गोसावी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जयंत शिरसाठ, मुद्देमाल कारकून हवालदार साळवे तसेच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीनिवास देशमुख, मुद्देमाल कारकून सहायक उपनिरीक्षक बागूल आदी उपस्थित होते.

























