नाशिक – विशेष प्रतिनिधी
बेशिस्त व अनियंत्रित वाहतुकीसाठी जीवघेण्या ठरलेल्या शहरातील वडाळा रोड वरील हाजी लॉन्स जवळ आज (दि. १५) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या भीषण अपघातात सुहाना शेख या १६ वर्षीय कॉलेज विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातास जबाबदार ठरलेल्या ट्रक चालकाने मद्यप्राशन केले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वडाळा रोडवरील मुमताज पार्कसमोर ही घटना घडली. १६ वर्षीय सुहाना शेख ही आपल्या दुचाकीवरून कॉलेजला जात असताना मागून भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकने (एमएच १५ जेके ७०११) दुचाकीला धडक दिली. या धडकेमुळे सुहाना ट्रकच्या मागच्या चाकाखाली आली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताचे वृत्त समजताच मुंबई नाका पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आयशर ट्रकचालकास अटक केली. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. वडाळा रोड हा बेशिस्त व अनियंत्रित वाहतुकीचा रस्ता म्हणून ओळखला जातो. सह्याद्री हॉस्पिटलनजिक असलेला सिग्नलही सर्रासपणे तोडून वाहने हाकली जातात. या मार्गावर वाहतूक शाखेचे पोलीस अभावानेच येत असल्याचे येथील वाहतूक दिवसेंदिवस जीवघेणी होत आहे.

























