पंचवटी – विशेष प्रतिनिधी
अपघाती विम्याचे पैसे बेकायदेशीर मार्गाने मिळविण्याच्या उद्देशाने भिकाऱ्याचा खून करून
तो अपघात असल्याचे भासवून विम्याचे पैसे बेकायदेशीर मार्गाने मिळविण्याचा कट रचणाऱ्या टोळीतील संशयित योगेश राजेंद्र साळवी (वय ३१, रा. वैष्णव रोड, मालेगाव स्टँडजवळ, उताराला, पंचवटी) यास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले आहे. साडेतीन वर्ष फरार असणारा हा संशयित वेषांतर करून नर्मदा परीक्रमा, महाकुंभमेळा प्रयागराज, त्र्यंबकेश्वर अशा धार्मिकस्थळी रहात होता.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, मुंबई नाका पोलीस ठाणे येथे दाखल मोटार अपघाताच्या गुन्हयाचे तपासावरून सरकारतर्फे फिर्यादी होत उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांनी म्हसरूळ पोलीस ठाणे येथे दिलेल्या तकारी वरून आरोपी नामे मंगेश सावकार, रजनी उके, दिपक भारूडकर, प्रणव साळवी, योगेश साळवी व मयत अशोक भालेराव यांनी अशोक भालेराव हे हयात असतांना संगनमताने अशोक भालेराव यांच्या नावाने काढलेल्या अपघाती विम्याचे पैसे बेकायदेशीर मार्गाने मिळविण्याचा कट रचला. त्यासाठी अशोक भालेराव सारख्या दिसणाऱ्या भिकारी माणसाचा खुन करून तो अपघात असल्याचे भासवले. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी २८ डिसेंबर २०२२ रोजी गुन्हा नोंदवला होता. तेव्हापासून योगेश साळवी हा फरार होता.
या फरारी संशयिताचा माग काढत असताना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकातील अंमलदार विलास चारोरकर व नितीन जगताप यांना गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, संशयितहा योगेश साळवी हा फनिबाबा दर्गा (लोणार गल्ली जवळ, नाशिक) येथे असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार रविवारी (दि. १३) सायंकाळी सापळा रचून त्यास ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यास म्हसरूळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त (गुन्हे)
किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, उपनिरीक्षक सुदाम सांगळे, हवालदार रविंद्र आढाव, रोहिदास लिलके, विलास चारोस्कर, नितीन जगताप, राम बर्डे, गोरख साबळे, राहुल पालखेडे, अनुजा येलवे, समाधान पवार यांनी ही कामगिरी केलेली आहे.

























