नाशिक – विशेष प्रतिनिधी
गंगापूर धरण तसेच पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधारेमुळे गोदावरीला तिसरा पूर आला आहे. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला गोदेच्या पाण्याची पातळी पुन्हा एकदा वाढल्याने रविवारी भाविकांना गोदास्नानापासून वंचित रहावे लागणार आहे. रात्री उशिरा दुतोंडी हनुमानाच्या कमरेच्या पाण्याची पातळी गेली होती.
शहर व ग्रामीण भागात यंदा पावसाचे समाधानकारक आगमन झाले आहे. त्र्यंबकेश्वरसह नाशिक शहर, गंगापूर धरण व पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने
धरणातून अनेक दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्यामुळे गोदाघाट जलमय झाला आहे. .
शनिवारी शहरात आषाढी एकादशीसाठी लगबग सुरु असताना दिवसभर पाऊसही सुरु होता. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली. पुराचे मापक समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या हनुमानाच्या कंबरेवर पाणी पातळी वाढली असून सांडवे व लहान मंदिरेही पाण्याने वेढले गेले. एकमुखी दत्त मंदिराच्या पायऱ्यांना पाणी लागले असून य.म. पटांगण व लगतचा परीसर पाण्याखाली गेला आहे.

























