नाशिक – विशेष प्रतिनिधी
कंपनीचे नुकसान करण्याची तसेच वैयक्तिक हमी रोखली जाईल अशी ईमेलद्वारे धमकी देत नाशिकच्या उद्योजकासह सहकाऱ्यांकडून तब्बल २८ कोटींची खंडणी मागण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी दोघा श्रीलंकन नागरिकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. मथिवाथनी सेल्वासुंदरम व अँडी नवाज खान (दोघेही रा. सिनेमन लाईफ जवळ, कोलंबो, श्रीलंका) अशी दोघा आरोपींची नावे आहेत.
चिराग विलास पाटील (वय ३८ वर्षे, व्यवसाय-आर्ट ऑफ लिव्हींग प्रशिक्षक, रा. अभियंता नगर, कामठवाडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एप्रिल २०२३ ते १३ जून २०२५ दरम्यान ही घटना घडली. ईव्हा ग्रीन प्लॅनेट प्रा.लि. नाशिक चे संचालक चिराग पाटील, कु. ऐश्वर्या देव पेंदयला (रा. हैद्राबाद), नितेश त्रिपाठी (रा. इंदौर) व बाकी भागधारकांनी कंपनी स्थापन करतेवेळी आर्टीकल ऑफ असोसिएशन व मेमोरेंडम ऑफ असोसिएशन प्रमाणे कंपनी उभारणीकामी ठरल्याप्रमाणे रक्कम भरली. परंतू कंपनीचे इतर संचालक सौ. मथिवाथनी सेल्वासुंदरम आणि अँडी नवाज खान यांनी संगनमताने रक्कम न भरल्याने कंपनी सुरू होण्यास व्यत्यय आला. त्यांना वारंवार रक्कम भरण्याकरीता सांगितले असता त्यांनी कंपनीचे नुकसान करण्याचे उददेशाने भिती दाखवून वेळोवेळी खंडणी स्वरूपात रक्कम १६ व १२ कोटी रूपयांची मागणी केली. ‘इं.रि.ए.डे.ए.’ कडून ईव्हा ग्रीन प्लॅनेट प्रा.लि. या कंपनीला आम्ही दिलेली वैयक्तिक हमी रोखली जाईल, अशी ईमेलद्वारे धमकी दिली.
तसेच कंपनीच्या संचालकांनी स्वाक्षरीचे कागदपत्रे तसेच कंपनीचे लेटर हेड कंपनीच्या संचालीका सौ. मथिवाथनी सेल्वासुंदरम आणि संचालक श्री अॅंडी नवाज खान यांना विश्वासाने कंपनी संबंधातील कागदपत्राची पूर्तता करणे दिले असता त्यांनी विश्वासघात करून त्या कागदपत्रावरील चिराग पाटील यांच्या सहीची इमेज कॉपी करून ती ईमेज आर.बी.आय. ला पाठविण्या करीता पत्रावर अप्रामाणिक पणे इलेक्ट्रॉनिक माध्यमाव्दारे पेस्ट केली. ती सही चिराग पाटील यांनी केलेली नसताना त्यांनीच सही केल्याचे भासवून बनावट दस्त तयार केला. हा दस्त आर.बी.आय. चे ईमेलवर पाटील यांच्या संमतीशिवाय पाठविण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्याच्या श्रीमती पलांडे तपास करत आहेत.

























