नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहरातील बहुचर्चित यशवंत मंडईच्या जागेवर बहुमजली वाहनतळ उभारण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. हा एक साधा विकास प्रकल्प राहिला नसून तो बनलाय एका दिवंगत लोकप्रतिनिधीच्या स्वप्नाचं साकार रूप, एका कुटुंबाच्या संघर्षाचं फलित आणि स्थानिक नागरिकांच्या संयमाचा विजय. हा पार्किंग कॉम्प्लेक्स एका संकल्पनेचा, एका दूरदृष्टीचा, आणि समाजासाठी सर्वार्पण केलेल्या नेतृत्वाचा ठसा आहे. या प्रकल्पामुळे येणाऱ्या काळात रविवार कारंजा परिसर फक्त व्यापारी दृष्टिकोनातून नव्हे, तर नियोजनबद्ध शहरी विकासाच्या दृष्टीनेही एक उदाहरण म्हणून ओळखले जाईल यात शंकाच नाही.
रविवार कारंजा परिसर… नाशिकच्या हृदयस्थानी वसलेली ही पारंपरिक बाजारपेठ, जिथे सणासुदीच्या काळात हजारो पावले खरेदीसाठी आपली वाट शोधतात. सणवार असो वा आठवडी बाजार येथे नेहमीच ग्राहकांची वर्दळ असते. मात्र हीच वाढती गर्दी गेल्या काही वर्षांपासून येथील वाहतूक कोंडीचे कारण बनली होती. येथील अरुंद रस्ते, बेशिस्त पार्किंग आणि वाहनांची वाढती गर्दी यामुळे स्थानिक, व्यापारी, ग्राहक सगळेच त्रस्त झाले होते.

ही समस्या ओळखून, त्या काळात माजी नगरसेविका स्व. सुरेखा भोसले यांनी दूरदृष्टी ठेऊन एक कल्पना मांडली. मोडकळीस आलेली यशवंत मंडई पाडून त्या जागी बहुमजली वाहनतळ उभारण्याची कल्पना. या पार्किंग कॉम्प्लेक्समुळे केवळ एका इमारतीचे पुनरुत्थान होणार नव्हते, तर संपूर्ण परिसराला नवसंजीवनी मिळणार होती. हीच दूरदृष्टी समोर ठेऊन एका लोकाभिमुख लोकप्रतिनिधीने या स्वप्नपूर्तीसाठी मोठा संघर्ष केला.
त्यांच्या पुढाकाराने या यशवंत मंडईचा समावेश स्मार्ट सिटी प्रकल्पात करण्यात आला. सुरुवातीस हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर राबवण्याचा प्रयत्न झाला. पण स्मार्ट सिटी कंपनीने व्यवहार्यता नाकारली. पुढे BOT तत्वावर प्रकल्प साकारण्याचा प्रस्ताव आला व प्रकल्पाचा खर्च ७० कोटींवर पोहोचला, निविदा निघूनही कोणत्याही कंपनीने प्रतिसाद न दिल्याने अखेर महापालिकेने स्वतः वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र इथेच आणखी एक मोठा अडथळा निर्माण झाला आणि मंडईतील भाडेकरूंनी कोर्टात धाव घेतली. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झालं, ती धोकादायक असल्याचं स्पष्ट झालं. परंतु न्यायालयीन प्रक्रियेमुळे पाडकामाला परवानगी मिळत नव्हती.
अशा एक ना अनेक कारणांमुळे हा प्रकल्प तब्बल सहा वर्ष रखडलेला होता. पण जेव्हा स्वप्न केवळ एका व्यक्तीचे राहत नाही, तेव्हा त्याचा पाठपुरावा करणारे अनेक हातही निर्माण होतात. स्व. सुरेखाताईंच्या निधनानंतर, त्यांच्या स्वप्नाच्या पूर्णत्वासाठी पुढे आले त्यांचे सुपुत्र सचिन रमेश भोसले त्यांनी या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं.
महापालिका प्रशासन, स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी जाब विचारले, तत्कालीन पालकमंत्री ना. दादाजी भुसे यांच्यापर्यंत पत्रव्यवहार, प्रत्यक्ष भेटी, निवेदने दिली. “जोपर्यंत यशवंत मंडईच्या जागेवर वाहनतळ होत नाही, तोपर्यंत या परिसरात इतर कोणतेही काम होऊ देणार नाही” ही त्यांची ठाम भूमिका होती. हा सातत्यपूर्ण प्रयत्न आणि लोकाभिमुख संघर्ष शेवटी फळाला आला. न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला आणि तब्बल सहा वर्षांनंतर हा प्रकल्प आता पूर्णत्वास जात आहे.


























