– रश्मी भोसले यांचे ना. भुसेंना निवेदन
नाशिक । विशेष प्रतिनिधी
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या यशवंत मंडईच्या जागेवर प्रस्तावित बहुमजली कार पार्किंग प्रकल्पासाठी ‘पीपीपी’ तत्वाची निविदा प्रक्रिया ताबडतोब थांबवून ती नगर विकास विशेष सोयी सुविधा निधीतून अथवा सिंहस्थ कुंभमेळा निधीतून विकसित करण्याची तसेच या प्रकल्पामध्ये व्यापारी संकुलचाही समावेश करण्याची तातडीची मागणी शिवसेनेच्या पदाधिकारी तसेच स्व. सुरेखाताई भोसले सामाजिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रश्मी भोसले तसेच सचिन भोसले यांनी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यशवंत मंडई येथील प्रकल्प येथील वाहतूक आणि पार्किंग समस्येवरचा आवश्यक उपाय आहे, परंतु नाशिक महानगरपालिकेने तो ज्या ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ अर्थात ‘पीपीपी’ तत्त्वावर काढला आहे. त्यावर आक्षेप घेताना ही प्रक्रिया ताबडतोब थांबवण्याची निकड, सिंहस्थ कुंभमेळ्याचे महत्व आणि नागरिकांवरील बोजाः नाशिक महानगरपालिकेने सदर प्रकल्पाची जी निविदा प्रक्रिया सुरु केली आहे, ती ताबडतोब थांबवणे जनहितार्थ अत्यावश्यक असल्याचे, सौ. भोसले यांनी निवेदनात नमूद केले आहे.
‘पीपीपी’ तत्वाचा वापर झाल्यास अवाजवी शुल्काच्या या मॉडेलमध्ये खासगी कंपनीला त्यांच्या गुंतवणुकीवर परतावा मिळवून देण्यासाठी सामान्य नागरिकांकडून ३० वर्षे (संभाव्य) अवाजवी दराने पार्किंग शुल्क आकारले जाईल. मूलभूत सार्वजनिक सुविधेसाठी असा आर्थिक बोजा टाकणे अन्यायकारक आहे. सार्वजनिक सेवेचे स्वरूपः पार्किंगसारखी अत्यावश्यक सुविधा ही सार्वजनिक सेवा मानली जावी, केवळ व्यावसायिक नफा कमावण्याचे साधन नसावे, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला हा प्रकल्प रामकुंडाजवळच्या परिसरातच होणार आहे आणि येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा व आवश्यक आहे. त्यामुळे, हा प्रकल्प तातडीने व जलदगतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी हा प्रकल्प सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विशेष निधीतून किंवा शासनाच्या नगर विकास मंत्रालयाच्या विशेष सुविधा निधीतून’ किंवा महापालिकेच्या स्वतःच्या निधीतून विकसित करणे योग्य ठरेल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या महत्त्वाच्या भूखंडाचा उपयोग केवळ पार्किंगसाठी न करता, ‘एमएलसीपी’ च्या आराखड्यात नियोजन बद्ध व्यापारी संकुल समाविष्ट केल्यास, महापालिकेला दुकाने, गाळे भाड्याने देऊन दीर्घकाळ कायमस्वरूपी आणि निश्चित उत्पन्न मिळू शकते. हे व्यापारी संकुलाचे उत्पन्न महापालिकेच्या आर्थिक स्थैर्यासाठी आणि नागरिकांना पार्किंगचे दर परवडणारे ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.
—————————————————-
लवकरच निर्णय घेऊ – ना. भुसे
सौ. रश्मी सचिन भोसले यांनी दिलेल्या निवेदनानंतर बोलताना ना. दादाजी भुसे म्हणाले, “नाशिक शहरातील यशवंत मंडईचा परिसर किती महत्त्वाचा आहे, याची मला कल्पना आहे. हा प्रकल्प केवळ पार्किंगची सोय नाही, तर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आणि स्थानिक व्यापारी, स्थानिक रहिवाशी व नागरिकांच्या हिताशी जोडलेला आहे. सार्वजनिक सुविधा ही व्यावसायिक नसावी, या मागणीमध्ये तथ्य आहे. नागरिकांचे हित आणि प्रकल्पाची तातडीची गरज लक्षात घेऊन, या कामाला ‘पीपीपी’ ऐवजी सिंहस्थ कुंभमेळा निधीतून गती देण्यासाठी तसेच महापालिकेच्या वतीने कायमस्वरूपी उत्पन्न देणारे व्यापारी संकुल विकसित करण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे. नाशिकच्या हिताचा आणि जनतेला दिलासा देणारा योग्य निर्णय लवकरच घेतला जाईल.”

























