नाशिक – विशेष प्रतिनिधी
अत्यंत वर्दळीच्या कॉलेजरोडवरील ‘एसके मॉल’च्या इमारतीवरून मालकासोबत झालेल्या वादानंतर मानसिकदृष्टया खचलेल्या कार पेंटर युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र सामाजिक कार्यकर्ते, पोलीस व अग्निशमन दल यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा युवक सुखरूप राहिला. त्यास पोलीस ठाण्यात नेऊन समुपदेशन करण्यात येत आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आज (दि. १६) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हा थरार कॉलेजरोडवर अनुभवयास मिळाला. एस.के. मॉलच्या टेरेसवरून एक युवक विमनस्क अवस्थेत उडी मारण्याच्या प्रयत्नात असल्याचे पाहून तिथे बघ्यांची गर्दी जमली. या गर्दीमुळे तो युवक अधिकच भेदरला. ही घटना पहाताच तेथून जाणारे ॲड. अजिंक्य गिते यांनी तत्काळ वरिष्ठ पोलीस अधिकारी मधुकर कड तसेच अग्निशमन दलाशी संपर्क साधला. कड यांनी तत्काळ गंगापूर पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस पथकही घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल जवानांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्या युवकाने उडी घेतल्यास त्यास इजा होऊ नये यासाठी जाळेही धरले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी तिसऱ्या मजल्यावर जात या युवकाची समजूत काढली. त्यास मदतीचे आश्वासन देत त्याच्याशी संवाद साधला व त्याचे मन वळवून सुखरूप ताब्यात घेतले. यामुळे जमलेल्या नागरिकांनी व व्यावसायिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

आत्महत्येचा प्रयत्न करणारा युवक हा कार पेंटर असल्याची चर्चा होती. मालकासोबतचा वाद तसेच आर्थिक ओढाताण यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समजते. त्यातूनच त्याने आत्महत्या करण्याचा आतातायीपणा केला. परंतू ॲड. अजिंक्य गिते यांनी समयसुचकता दाखवल्याने एक अप्रिय घटना टळली.



























