– पाऊस न थांबल्यास विसर्ग वाढणार….
नाशिक – विशेष प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर तसेच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेला संततधार आणि शहरात शनिवारी सायंकाळपासून सुरु असलेल्या मुसळधारेमुळे गोदावरीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून सकाळी ११ वाजता सहा हजार ५१३ क्युसेस पाण्याचा विसर्ग होत असल्याने गोदावरीच्या पुराचे मापक समजल्या जाणाऱ्या दुतोंडी हनुमानाच्या गळ्यापर्यंत पाणी पोहचले आहे. गोदाघाटावर निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक शहरासह ग्रामीण भागात शनिवारी सायंकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. रविवारी तर नाशिकसह सहा जिल्ह्यांना पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. रात्रभर पावसाची संततधार सुरूच राहिल्याने त्र्यंबकेश्वर शहरातील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. येथील पावसामुळे तसेच पाणलोट क्षेत्रातील संततधारेमुळे पाण्याची वाढती आवक लक्षात घेऊन गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरीला पुन्हा पूर आला आहे. दारणा धरणातूनही १२ हजार क्युसेसहून अधिक पाण्याचा विसर्ग होत आहे.
गोदेच्या पाण्याची पातळी वाढल्याने रामकुंड येथील दशक्रिया विधीची छत्री, लहान मंदिरे, सांडवे पाण्याखाली गेले आहेत. एकमुखी दत्त मंदिराच्या पायऱ्यांवर पूराचे पाणी पोहचले असून
सांडव्यावरील देवी मंदिरासह मोठ्या मंदिरामध्ये पाणी शिरले असून अग्निशामक दलाचे जवान गोदाकाठी तैनात करण्यात आले आहेत. पुढील काळात धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने गोदाघाटावरील नागरिकांना स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. गोदाकाठी राहणाऱ्या नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. दरम्यान, शहरातील काही भागात पावसाचा फटका नाशिककरांना बसला असून सकाळी सात पासून वकीलवाडी येथे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. पंचवटीतील श्रीराम नगर भागात शनिवारी संध्याकाळी विद्युत दाब वाढल्याने अनेक घरातील विद्युत उपकरणे बंद पडली आहेत.
—————————————————-
रावण दहन की विसर्जन ?
यंदा मे महिन्यापासून नाशिक शहर व परिसरात पाऊस सुरु आहे. त्यातच गोदावरीला यंदा ४/५ वेळा पूर येऊन गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसाने वैतागलेल्या नेटकऱ्यांनी समाज माध्यमांवरही ‘मिम्स’ चा पूर आणला आहे. ‘यंदा रांगोळी घरात व अंघोळी दारात’……’यंदा रावण दहन करायचे की विसर्जन ?’….’आता फक्त अंगावर शेवाळं यायचं बाकी’, या व अशा सारखे अनेक मिम्स समाज माध्यमांवर फिरत आहे. संततधारेमुळे रविवार असूनही नाशिककरांना सक्तीने घरात थांबावे लागले आहे.
(सर्व छायाचित्रे – अथर्व निरंतर)

(सांडव्यावरील देवी मंदिरात शिरलेले पुराचे पाणी)

(रामसेतू पुलाला लागलेले पुराचे पाणी)


























