पंचवटी – प्रतिनिधी
दिवसेंदिवस शहरातील शेती करण्याचे प्रमाण कमी झाले असून शेती नांगरणी करण्यासाठी बैलजोडी बघणे दुर्मिळ झाले आहे. परंतु अजूनही मखमलाबाद, म्हसरूळ, आडगाव, नांदूर मानूर शिवारातील काही हौशी शेतकऱ्यांकडे अजूनही बैलजोडी असल्याने त्यांच्यामध्ये बैल पोळ्याच्या दिवशी अमाप उत्साह दिसून आला. तर मखमलाबाद गावातही मोठ्या प्रमाणात मिरवणुक काढून पारंपरिक पद्धतीने बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी घरोघरी मातींच्या बैलांचे पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला.
पिठोरी अमावस्या म्हणजे बैलपोळा या दिवशी ज्या-ज्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी व गाय-वासरू आहेत अशा शेतकऱ्यांनी बैलजोडीसह गाय-वासरू यांना आंघोळ घालण्यात आली. त्यानंतर बैलजोडीसह गाय-वासरू यांना पाठीवर नक्षीकाम केलेली आकर्षक झूल.. शिंगांना बेगडं.. डोक्याला बाशिंग.. गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा..नवी वेसण.. कासरा.. पायात करदोड्याचे तोडे आणि सर्वांगावर गेरूचे ठिपके अशाप्रकारे लक्षवेधी सजावट केलेली बैलजोडीसह गाय-वासरू व अश्व यांची गावासह परिसरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
गावातील ग्रामदैवत मारूती मंदिरासमोर बैलजोडींकडून सन्मानपूर्वक सलामी देण्यात आली. ठिकठिकाणी महिलांकडून बैलजोडीसह गाय-वासरू यांचे औक्षणाने पूजन करून गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नधान्याच्या नैवेद्य दाखविण्यात आला.शेतकऱ्यांकडून बैलजोडीसह गाय-वासरू यांचे पूजन करण्यात येते. मात्र यांत्रिक पद्धतीने शेतीमुळे आज ज्यांच्याकडे बैलजोडी नाही त्यांनी घरोघरी मातीच्या बैलांचे पूजन करून पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा केला.
मखमलाबाद येथे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पालवे यांच्या हस्ते बस स्थानक परिसरात श्रीफळ वाढवून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी टांगाप्रेमी शेतकरी मोतीराम पिंगळे, संजय पिंगळे, विक्रम पिंगळे, रोशन पिंगळे आदी शेतकऱ्यांनी बैलजोडी व अश्व यांची मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढली. बैलपोळा हा राष्ट्रीय उत्सव असून खरतरं शेतकरी वर्गात अत्यंत महत्त्वाचा सण समजला जातो. बैलपोळा निमित्ताने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. बैलपोळा साजरा करून शेतकऱ्यांनी आपल्या जीवलग बैलजोडीसह गाय-वासरू यांचे ऋण व्यक्त केले.
परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी
मखमलाबाद परिसर झपाट्याने वाढला आहे. अनेक लोक नोकरी व्यवसायानिमित्त परिसरात स्थायिक झाले आहेत. त्यातच बैलजोडी बघणे दुर्मिळ झाल्याने अनेकांनी मखमलाबाद गावात पोळ्यानिमित्त बैलजोडी आणि मिरवणूक बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अनेकजण बैलांबरोबर आपल्या मोबाईलमध्ये छायाचित्र टिपून घेताना दिसून आले.


























