नाशिक – विशेष प्रतिनिधी
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्ताने नाशिक महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक २० मधील लोकमान्य टिळक उद्यानात शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून एक आगळीवेगळी सामाजिक जाणीव जपणारी कृती करण्यात आली.
उद्यानातील लोकमान्य टिळक यांचे भित्तीशिल्प व परिसर धूळ खात, अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत असल्याचे निदर्शनास आल्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत शिल्पाची साफसफाई केली व परिसर स्वच्छ केला.
नाशिकरोडमधील लोकमान्य नगर परिसरात असलेल्या उद्यानातील लोकमान्य टिळक यांच्या भित्तीशिल्प व उद्यानाची दुरावस्था झाली होती.
प्रभागाचे उपविभाग प्रमुख अश्विन पवार यांनी त्वरित लक्ष देत शिवसेना पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधला. यानंतर शिवसेना जिल्हा सचिव मसूद जिलानी, उपमहानगरप्रमुख योगेश देशमुख, विभाग प्रमुख सागर निकाळे युवासेना अधिकारी निलेश शिरसाट, कुणाल सहाने, आशिष शहाणे, केतन पवार, अक्षय करोशिया, हेमंत भोळे ,राहुल गायकवाड अनिकेत साळवे इतर कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन शिल्पाची साफसफाई केली व परिसर स्वच्छ केला. यानंतर सर्वांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्पगुच्छ अर्पण करून टिळक जयंती साधेपणाने पण अत्यंत विचारपूर्वक साजरी केली.
ही कृती मनपा प्रशासनाला खडा सवाल करणारी ठरली आहे. ज्या महानगरपालिकेच्या हद्दीत हे उद्यान आहे, तिथेच टिळक जयंतीच्या दिवशी कोणतीही सजावट, स्वच्छता किंवा कार्यक्रम न होता, नागरिकांनीच पुढाकार घेऊन आदरांजली अर्पण करावी लागते, हे खेदजनक आहे. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” या टिळकांच्या विचारांना सलाम करत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी त्यांचे कार्य फक्त अभिवादनापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवले.

























