नाशिक – विशेष प्रतिनिधी
विश्वास को-ऑप. बँकेची २९वी वार्षिक सर्वसाधारण सभा विश्वास गार्डन, सावरकरनगर, नाशिक येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास लिलावती जयदेव ठाकूर होते. यावेळी श्री. ठाकूर यांनी बँकेच्या २९ वर्षांच्या वाटचालीचा व प्रगतीशीलतेचा आढावा घेतला.
बँकिंग क्षेत्रातील झपाट्याने होणारे बदल, तंत्रज्ञानाची प्रगती आणि ग्राहकांच्या अपेक्षांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता, विश्वास बँक ‘आधुनिक सेवा ग्राहकहित’ यांचा सुरेख समन्वय साधत आहे. त्यामुळेच आम्ही बँकिंग सेवा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि ग्राहकाभिमुख देत आहोत. विश्वास बँक अनेक डिजिटल उपक्रम राबवत आहे. मोबाईल बँकिंगचा विस्तार, ग्राहक सेवा प्रणाली आणि इंटरनेट बँकिंगच्या नव्या सोयी यामुळे सेवा अधिक कार्यक्षम व सुलभ झाली आहे, ही सर्वांसाठी गौरवाची बाब आहे, हे यश म्हणजे बँकेच्या कार्यक्षमतेची, पारदर्शकतेची आणि सभासद, ग्राहकांच्या विश्वासाची पावती असल्याचे श्री. ठाकूर म्हणाले.
बँकेच्या शिवाजीनगर (सातपूर) व उपनगर (नाशिकरोड) या दोन शाखांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगी मिळाली आहे. या शाखा जून २०२५ मध्ये सुरू झाल्या आहेत. बँकेने या आर्थिक वर्षांत ९४४ कोटी रुपयांपर्यंत मिश्र व्यवसाय केला असून येत्या आर्थिक वर्षात रु. एक हजार कोटी व्यवसायापर्यंत लक्ष्य साध्य करेल हे निश्चितच. हे आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचेच यश आहे. बँकेच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्थापनप्रणालीमुळे दरवर्षी बँकेला पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. याही वर्षी नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन, नाशिक तर्फे ५०१ ते ७०० कोटीपर्यंत ठेवी असलेल्या बँकांच्या गटात द्वितीय न्युबा अवार्ड २०२३-२४ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबई तर्फे पद्भूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार २०२३-२४ रु. ५०० ते रु. एक हजार कोटीपर्यंत ठेवी असणार्या विभागात जाहीर झालेला आहे. आपल्या बँकेचे मोबईल अॅप ही सुरू झाले आहे. त्यामुळे डिजीटल बँकिंगच्या स्पर्धेत बँक यशस्वीपणे ग्राहक सेवा देत आहे. तिडके कॉलनी येथे या आर्थिक वर्षांतील तिसरी शाखा सुरू होईल. बँकेच्या तब्बल 16 शाखा होत आहेत.
सभेचे सूत्रसंचालन बँकेचे मानद कार्यकारी संचालक मंगेश पंचाक्षरी यांनी केले. तर स्वागत संचालक डॉ. वासुदेव भेंडे यांनी केले. इतिवृत्त वाचन मंगेश पंचाक्षरी यांनी केले. श्रद्धांजलीचे वाचन संचालक डॉ. सुभाष पवार यांनी केले. विषय पत्रिकेचे वाचन अजित मोडक यांनी केले. त्याचप्रमाणे बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर, उपाध्यक्ष डॉ. चंद्रकांत संकलेचा, जनसंपर्क संचालक घनश्याम येवला, संचालक डॉ. वासुदेव भेंडे, डॉ. सुभाष पवार, विलास हावरे, कैलास पाटील, शशिकांत येवला, मंगला कमोद, मुख्य कार्यकारी अधिकारी सारिका देशपांडे तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश बागुल यांनी विषय पत्रिकेनुसार विषयांची मांडणी करून प्रत्येक विषयावर सभासदांनी पारदर्शक चर्चा घडवून आणली व बँकेच्या सद्य स्थितीची व भविष्यातील ध्येय धोरणांची माहिती जाणून घेतली.
बँकेचे संचालक डॉ. सुभाष पवार यांनी आफ्रिका खंडातील सर्वात उंच व जगातील एक खांबी सर्वात उंच पर्वत किलीमांजारो (५८९५ मिटर) सर करून भारताचा झेंडा फडकवला. तसेच वयाच्या ६९ व्या वर्षी एव्हरेस्ट शिखर गाठण्यासाठी कॅम्प ३ पर्यंत मजल मारली व ७१०० मीटर उंची पर्यंत पोहोचणारे एकमेव भारतीय ठरले. याबद्दल बँकेचे संचालक डॉ. कैलास कमोद यांच्या हस्ते डॉ. पवार यांचा सन्मान करण्यात आला.
सभेस बँकेचे व्यवस्थापन मंडळातील सदस्य डॉ. प्रशांतकुमार पाटील, अॅड. दत्तप्रसाद निकम, विनय अंधारे, प्रदिप गांगुर्डे, टी. बी. उशीर, विनायक रानडे, अमित शाह, राधिका कुलकर्णी, डॉ. हरी कुलकर्णी, सीमा सोनार, जगदीश सोनार, एम. एन. सैंदाणे, जी. आर. पोतदार, जयप्रकाश येवले, धनंजय ठाकूर, समर बॅनर्जी तसेच महाप्रबंधक सुरेश वाघ, किशोर त्रिभुवन, महेंद्र पवार, वरिष्ठ व्यवस्थापक भूषण भोसले, कैलास आव्हाड आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन बँकेचे संचालिका सौ. वैशाली होळकर यांनी केले.
विश्वास बँकेच्या ३१ मार्च अखेर एकूण ठेवी रु. ५७२ कोटी ७५ लाख झाल्या असून कर्ज वाटप रु.
३७२ कोटी ०३ लाख व सीडी रेशो ६४.९६ टक्के इतका आहे. बँकेचा एकूण व्यवसाय रु. ९४४ कोटी ७८ लाखांपर्यंत पोहोचला आहे. बँकेला ढोबळ नफा सात कोटी ५६ लाख रुपये व निव्वळ नफा चार कोटी १४ लाख रुपये झालेला आहे. बँकेचे भागभांडवल रु.१८ कोटी ४९ लाख असून सभासद संख्या नऊ हजार ९८३ इतकी आहे, बँकेचा निधी रु. ३८ कोटी ७५ लाख, गुंतवणूक रु. १९३ कोटी २१ लाख, थकबाकी वसुली ९८.१६ टक्के, ग्रॉस एनपीए ३.८४ टक्के, नेट एनपीए २.०९ टक्के, सीआरएआर १५.३० टक्के तर खेळते भांडवल रु. ६३५ कोटी ०१ लाख इतके आहे.

























