– गोदाकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा…
नाशिक – विशेष प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर परिसरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या संततधारेमुळे गोदावरी नदीची पाणी पातळी मंगळवारी दुपारी पुन्हा वाढली आहे. गोदेच्या पुराचे मापक समजल्या जाणाऱ्या दुतोंडी हनुमानाच्या कमरेवर पाणी पोहचले असून गोदाकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे.
नाशिक शहर व जिल्ह्यात मे महिन्यापासून सातत्याने पाऊस होत आहे. सततच्या पावसामुळे गंगापूरसह जिल्ह्यातील बहुतांशी धरणे भरली असून धरणातून सातत्याने विसर्ग होत असल्याने मराठवाड्याला पाणी पुरवठा करणारे जायकवाडी धरणही तीन वर्षांनंतर भरले आहे. नांदूरमध्यमेश्वर येथून मराठवाड्याकडे पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.

( सर्व छायाचित्रे – राजेश पंड्या)
संततधारेमुळे यंदा श्रावण, गणेशोत्सव पावसात गेल्यानंतर सोमवारी घटस्थापना होत असताना पुन्हा पावसाचे जोरदार आगमन झाले. नाशिकमध्ये यलो अलर्ट असतानाच सोमवारी दोन तासात ३७ मिमी पाऊस झाला. नवरात्रीच्या पहिल्याचा दिवशी पाऊस झाल्याने आता नऊ दिवस पावसाची शक्यता ज्येष्ठ नागरिकांनी बोलून दाखवली. त्र्यंबकेश्वर व गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही सतत पाऊस होत असल्याने धरणातून विसर्ग सुरू असल्याने मंगळवारी गोदावरीच्या पाण्याची पातळी पुन्हा वाढली. गोदेकाठची लहान मंदिरे तसेच सांडवे पाण्याखाली गेली असून पावसासह पाण्याची पातळी जैसे थे राहिल्यास उद्या भरणारा बुधवारचा बाजार गणेशवाडीत स्थलांतरीत करावा लागणार आहे. पावसामुळे भुमिगत गटारीही उफाळल्या असून सांडपाणी गोदावरीच्या पाण्यात मिसळले जात आहे.































