नाशिक – विशेष प्रतिनिधी
देशभरातील शिवभक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असणाऱ्या
त्र्यंबकेश्वर मंदिरात ऑनलाईन दर्शन पास बनावट नावाने मिळवून त्याचा काळाबाजार करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला त्र्यंबकेश्वर पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच मंदिराचे पदसिध्द अध्यक्ष अतिरीक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साळी यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत असे गैरप्रकार उघडकीस आणून त्याबाबत कडक कारवाई करण्याचे त्र्यंबकेश्वर पोलिसांना सूचना दिल्या होत्या. या कारवाईमुळे श्रावण महिन्यात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दिलासा मिळणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप नाना झोले, सुदाम राजु बदादे (दोघेही रा. पेगलवाडी ता. त्र्यंबकेश्वर), समाधान झुंबर चोथे, (रा. रोकडवाडी, ता. त्र्यंबकेश्वर), शिवराज दिनकर आहेर (रा. निरंजनी आखाड्या जवळ, ता. त्र्यंबकेश्वर), मनोहर मोहन शेवरे (रा. रोकडवाडी) अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होत असते. त्यासाठी मंदिर प्रशासनातर्फे एक मोफत दर्शन रांग व एक देणगी दर्शन रांग असे दोन पर्याय आहेत. देणगी दर्शन रांगेसाठी प्रतिव्यक्ती २०० रुपये घेतले जातात त्यासाठी मंदिर परीसरात दर्शन पास काउंटर तसेच ऑनलाईन दर्शन पास काढण्याची व्यवस्था आहे.
मागील काही दिवसात माध्यमांमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर परीसरात ऑनलाईन दर्शन पास मध्ये काळाबाजारा होत असल्याबाबत प्रसिध्द झाले होते. त्याबाबत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच मंदिराचे पदसिध्द अध्यक्ष अतिरीक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साळी यांनी त्याची गंभीर दखल घेत, असे गैरप्रकार उघडकीस आणुन त्याबाबत कडक कारवाई करण्याचे त्र्यंबकेश्वर पोलिसांना सूचना दिल्या होत्या.

त्र्यंबकेश्वर पोलिसांनी याबाबत खातरजमा करुन गुप्त माहितीच्या आधारे त्र्यंबकेश्वर परिसरातुन पाच जणांना ताब्यात घेतले. ते बनावट नाव पत्ता व बनावट ओळखपत्र क्रमांक वापरुन मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पास मिळवायचे ते पास गरजवंत भाविकांना २०० रुपये दराचा देणगी पास प्रतिव्यक्ती ७०० रुपये ते १,००० रुपये या दराने विकून बनावट पासचा काळाबाजार करायचे. ही बाब त्यांचे झडतीतुन मिळालेल्या मोबाईल व मेल आयडीचे हिस्ट्रीवरुन दिसुन आल्याने त्यांचे विरुध्द पोलीस प्रशासनातर्फे तकार देवुन संघटीत पणे गुन्हा रजिस्टर क्रमांक १०२/२०२५ दाखल करण्यात आला असुन त्यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे. त्यांचे अत्तापर्यंत झालेल्या तपासात त्यांनी एकुण १६४८ बनावट देणगी पास काढल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये एकुण अंदाजे ५,००० भाविकांना बनावट पास चढयाभावाने विकल्याचे दिसून येत आहे.
या कारवाईमध्ये ऑनलाईन पास काढण्याची सिस्टीम ही सदोष असल्याचे दिसून येत असून त्यामध्ये अनेक सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा झाली असुन त्यामध्ये कडक योग्य त्या सुधारणा तातडीने करण्यात येणार आहेत.
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ वासुदेव देसले, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक रवी मगर, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गावित, हवालदार जाधव, मुळाणे, ठाकरे, बोराडे, राठोड हे पुढील तपास करीत आहेत.

























