मुंबई –
आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही. परंतू हिंदी भाषेची सक्ती लागणार असेल तर मराठी माणसाच्या एकजुटीची शक्ती आम्ही दाखवली आहे. महाराष्ट्र व मुंबईसाठी एकजूट दाखवा.
मराठा-मराठेतर, ब्राम्हण-ब्राम्हणेतर, घाटी-कोकणी, स्पृश्य-अस्पृश्य हे मतभेद विसरून मराठी माणसाने मराठी भाषेच्या रक्षणासाठी एकीची वज्रमुठ बांधा, असे भावनिक आवाहन राज व उद्धव या ठाकरे बंधूनी केले. मराठी बांधवांची एकजूट पाहून आता जातीय कार्ड खेळण्याचा प्रयत्न होईल, त्यापासून सावध रहाण्याचे आवाहनही करण्यात आले.
हिंदी सक्तीचा निर्णय मराठी माणसाच्या एकजुटीच्या रेट्याने राज्य सरकारला मागे घ्यावा लागला. यानिमित्त वरळी डोम येथे आयोजित विजयी मेळाव्यात मराठी भाषा व महाराष्ट्राची अस्मिता यासाठी तब्बल वीस वर्षांनी एकत्र आलेल्या राज व उद्धव या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने मराठी जनांमध्ये उत्साह व उत्सवी वातावरण होते. याप्रसंगी व्यासपीठावर फक्त राज उद्धव ठाकरे यांनाच स्थान होते. इतर सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच निमंत्रित व्यासपीठासमोर स्थानापन्न झाले होते.
कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा – राज ठाकरे
मेळाव्याला सर्वप्रथम मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संबोधित केले. ते म्हणाले, खरं तर आजच्या मेळाव्यापेक्षा मोर्चा निघायला हवा होता. मराठी माणूस कसा पेटून एकवटतो, हे चित्र सर्वांना दिसले असते. पण केवळ मोर्चाच्या चर्चेनेच सरकारला माघार घ्यावी लागली. कोणत्याही वाद-भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. जे बाळासाहेब व अनेकांना जमले नाही, ते देवेंद्र फडणवीस यांना जमल्याचे सांगून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा हेतू स्पष्ट केला. खरेतर हिंदीचा प्रश्न अनाठायी होता. सत्ता व बहुमत आहे म्हणून हिंदी लादण्याचा प्रयत्न झाला. पण तुमची सत्ता विधानसभेत आमची सत्ता रस्त्यावर आहे, असा सज्जड इशारा राज ठाकरे यांनी दिला.
त्रिभाषा सूत्र हे केंद्र व राज्य सरकार यांच्यातील दुवा म्हणून आणण्यात आले. केंद्रीय शिक्षण धोरणातही त्रिभाषा सूत्र नसल्याचे सांगताना दक्षिणेकडे हिंदी भाषेला कोणी हिंग लावून विचारत नसल्याचे सांगितलं. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार या हिंदीभाषिक राज्यांमध्ये कोणते त्रिभाषा सूत्र राबवणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ही हिंदी भाषिक राज्ये मागास आहे म्हणून तेथील लोक नोकरी व व्यवसायासाठी महाराष्ट्रात येतात. आम्हाला कोणत्याही भाषेचा अनादर नाही. मराठा साम्राज्य दूरवर पसरले असतानाही कधी मराठीची सक्ती झाली नव्हती.
हिंदी भाषा सक्ती म्हणजे मुंबई स्वतंत्र करता येते का, हे चाचपडून बघण्यात आले. कोणाची माय व्यायली असेल तर मुंबईला हात लावून दाखवावे. आम्ही शांत आहोत पण म्हणजे गांडू नाही, असा रोखठोक इशाराही राज ठाकरे यांनी दिला. आमची मुले इंग्रजी माध्यमात शिकल्याचा आरोप करण्यात आला. पण दादा भुसे मराठीत शिकूनही मंत्री व देवेंद्र फडणवीस इंग्रजी माध्यमा शिकूनही मुख्यमंत्री झालेच ना ?. बाळासाहेब ठाकरे व श्रीकांत ठाकरे हेही इंग्रजी माध्यमात शिकले. मात्र दोघांच्या मराठीच्या अभिमानाबद्दल शंका घेऊ शकाल का, असा सवाल करताना लालकृष्ण अडवाणी मिशनरी शाळेत शिकले. मग त्यांच्या हिंदुत्वाबद्दल शंका घ्यायची का, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
दक्षिणेकडील बहुतांशी नेते इंग्रजीत शिकले. मात्र ते आपल्या भाषेबद्दल सर्वाधिक कडवटपणा व अभिमान बाळगतात. लष्करातही विविध रेजिमेंटस आहे. पण समोर शत्रू उभा ठाकला की ते सर्व एकत्र तुटून पडतातच ना. मराठी म्हणून तुम्ही एकवटला आहात. आता ते पुढील राजकारणात जातीचे कार्ड खेळतील. आपल्यात विभाजन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला बळी पडू नका, असे कळकळीचे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

अनाजीपंताने अंतरपाट दूर केला – उद्धव ठाकरे
मराठी भाषेच्या रक्षणासाठी एकत्र आल्याचे सांगताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्या अंतरपाट अनाजीपतांने दूर केला, अशी बोचरी टीका केली. आता एकत्र आलो आहोत ते एकत्र रहाण्यासाठीच. आपल्या भाषेविरुद्ध संकट येते तेव्हा वरवरची लढाई करून चालणार नाही. आम्ही मराठीचा लढा सुरू केला तेव्हा म मराठीचा नसून महापालिकेचा असल्याची टीका करण्यात आली. परंतू हा म मराठीच तेवढाच महाराष्ट्राचा असल्याचे ठामपणे सांगितलं. आपल्यातील एकजूट कायम राहिली पाहिजे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा हिंदू-मुस्लीम यांच्यासाठी नव्हे तर मराठी व मराठेतर यांच्यासाठी होता. हाच प्रयोग त्यांनी गुजरातमध्ये पटेल-पटेलेतर, हरियाणात जाट-जाटेतर अशा पद्धतीने पेटवून सत्ता हस्तगत केल्याचे सांगून भाजपावर टीकास्त्र सोडले.
आपले पंतप्रधान तिकडे ‘स्टार अॉफ घाना’ चा पट्टा गळ्यात घालून मिरवतात. परंतू महाराष्ट्रात शेतकरी खांद्यावर नांगराचे जोखड घेऊन शेती करत असल्याचा विरोधाभास उपस्थित केला. देशात सर्वात जास्त कर्जबाजारी शेतकरी महाराष्ट्रात असल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला. आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही. मात्र सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर अशी शक्ती दाखवू की पुन्हा डोके वर काढणार नाही. यापूर्वी कोणत्याही लढ्यात भाजपा नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही जनसंघ सर्वात शेवटी सहभागी झाला होता. यांच्याकडून आम्ही देशाभिमान व महाराष्ट्रभिमान शिकायचा का ?
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबईसाठी अनेक शहिदांनी आपले रक्त सांडले. ती मुंबई यांना अदानीच्या घश्यात घालायची आहे. त्याविरोधात एकत्र या. हे संकट परतवून लावण्यासाठी आपल्यातील महाराष्ट्र धर्म जागा ठेवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केला. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असाल, परंतू आता संयुक्त महाराष्ट्र चळवळीप्रमाणेच एकजूट दाखवावी लागेल. मराठी भाषेसाठी आपली झालेली एकजूट पाहून आता मराठा-मराठेतर, ब्राम्हण-ब्राम्हणेतर, घाटी-कोकणी, स्पृश्य-अस्पृश्य असे वाद लावले जातील. हे मतभेद विसरून मराठी एकीची खूणगाठ मनाशी बाळगा, असे कळकळीचे आवाहनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रियाताई सुळे, जितेंद्र आव्हाड, शेकापचे जयंत पाटील, कॉ. प्रकाश रेड्डी, अजित नवले, मराठी भाषा मंडळाचे दीपक पवार, खा. संजय राऊत, आ. निकोले, डॉ. भालचंद्र मुणगेकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर तसेच आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, तेजस ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठी भाषा मेळाव्यासाठी वरळी डोम शिवसैनिक, मनसैनिक व मराठी जनांमुळे ओसांडून वहात होता. अनेकांनी रस्त्यावर उभे राहून भाषणे ऐकली. 



























