– मखमलाबाद परिसरात तासभर वाहतूक विस्कळीत…
पंचवटी – प्रतिनिधी
ड्रीम कॅस्टल ते मखमलाबाद गाव व सुयोजित गार्डन ते मखमलाबाद गाव हा रस्ता खड्डेमुक्त व काँक्रीटीकरण करावा या मागणीसाठी जिजाई फाऊंडेशनचे प्रमोद पालवे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.१८) फडोळ मळा चौक परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तासभर सुरू राहिलेल्या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. महापालिकेचे पंचवटी विभागाचे बांधकाम उपअभियंता नितीन राजपूत यांनी आंदोलकांची भेट घेत पंधरा दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजवले जाणार असल्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
मखमलाबाद गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने त्याचा नागरिक, विद्यार्थी व रुग्णांना त्रास होत आहे. यामुळे वाहतूक कोंडीसह अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत व लवकरात लवकर सदर रस्त्याचे रुंदीकरण करून काँक्रीटीकरण करावे या मागणीसाठी मखमलाबाद गाव आणि कॉलनी परिसरातील संतप्त नागरिकांनी गुरुवारी (दि १८) सकाळी ११ वाजता स्वर्गीय गंगाधर बाबुराव फडोळ मळा चौकात रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत महापालिकेच्या पंचवटी विभागाचे बांधकाम विभागाचे उपअभियंता नितीन राजपूत , भूषण जाधव यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्या मागणीचे निवेदन स्वीकारले. तसेच आगामी कुंभमेळ्यात हा रस्ता शंभर मीटरचा होणार असून रुंदीकरणासह काँक्रीटीकरण केले जाणार आहे. तर येत्या पंधरा दिवसात मखमलाबाद रोड व कॉलनी परिसरातील सर्व खड्डे बुजवण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. 

यावेळी जिजाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पालवे संचालिका मनीषा पालवे, ‘मविप्र’ संचालक रमेश पिंगळे, व्ही.एन.नाईक शिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब धात्रक, शिवतांडव प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश काकड, मखमलाबाद सोसायटीचे माजी सभापती संजय पिंगळे, बाळासाहेब पालवे, सुभाष तिडके, संजय पिंगळे, संतोष तिडके, महेश मानकर, प्रल्हाद माळी, अंकुश काकड, कल्पेश पिंगळे, राकेश खैरनार, तानाजी नेमाडे, महेश शेळके, कल्पना पिंगळे, ज्योती कुमावत, प्रकाश खराटे, तेजस भोज, संजय पिंगळे, पोपट काकड,अनिल काकड ,प्रल्हाद माळी, नितीन पिंगळे, योगेश काकड, प्रकाश खराटे, अविनाश शेळके, वसंत मुंदडा, सोयल पटेल, योगेश पिंगळे, चिंतामण उगलमुगले यांच्यासह शेकडो महिला पुरुष उपस्थित होते.
… अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन !
मखमलाबाद गावाला जोडणारे मुख्य दोन्ही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. महापालिकेने ड्रीम कॅस्टल ते मखमलाबाद व सुयोजित गार्डन ते मखमलाबाद हे दोन्ही रस्ते काँक्रीटचे बनवून द्यावे. कॉलनी रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने किरकोळ अपघात नित्याचेच झाले आहेत. प्रभाग सहामधील एकही कॉलनी रस्ता साधी सायकल चालवण्यासाठी देखील योग्य राहिला नाही. याकडे लक्ष कोण देणार असा प्रश्न उपस्थित करून भविष्यात जर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात घडून नागरिक जखमी झाले तर राजीव गांधी भवन येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल.
– प्रमोद पालवे (अध्यक्ष जिजाई फाउंडेशन).
… दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा
मखमलाबाद गावातून अनेक जेष्ठ नागरिक व महिला कामानिमित्त शहरातील इतर भागात येत असतात. मात्र रस्त्यांची झालेल्या दुरावस्थेमुळे जेष्ठ नागरिक व महिलांना प्रवास करताना त्यांचे हाडे देखील खिळखिळी झाली आहेत. सुयोजित गार्डनकडे देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्याच मार्गावर विविध शाळा, उच्च महाविद्यालये आहेत. खड्ड्यांमुळे विद्यार्थींनींना जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. सातपूर भागाकडे जाण्यासाठी देखील कामगार वर्ग मार्गाने जातो त्यांचेही हाल होतात. मनपा प्रशासनाने रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली केवळ अधिकारी आणि ठेकेदार यांचच भलं करण्याचं काम सुरू केलं असून कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून देखिल रस्त्यांची चाळण झाली असून आता कायमस्वरूपी चांगले रस्ते करून द्यावे.
– रमेश पिंगळे (संचालक, मविप्र).
मनपा अधिकाऱ्यांना काही देणं घेण नाही
लाखो रुपये नुसते खड्डे बुजविण्यावर खर्च केले तेवढ्या पैशात रस्ता तयार झाला असता. महापालिकेचे अनेक अधिकारी व कर्मचारी या भागात राहतात मात्र त्यांना देखील जनतेशी काही देणेघेणे नाही.
– ज्योती कुमावत (स्थानिक महिला).
हार घालून मनपा अधिकाऱ्यांचा सत्कार
मखमलाबाद गावाला जोडणाऱ्या दोन्ही रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. परंतू तरीही झोपलेले मनपा प्रशासन जागे होत नाही. अखेर मखमलाबाद परिसरातील नागरिकांना जनआंदोलन करावे लागले. पंचवटी बांधकाम विभागाचे उपअभियंता नितीन राजपूत आंदोलनस्थळी येताच त्यांचा जिजाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पालवे यांनी हार घालून सत्कार केला.

























