नाशिक – विशेष प्रतिनिधी
धार्मिकदृष्टया महत्त्वाचा असणाऱ्या श्रावणमासास
शुक्रवारी प्रारंभ होत आहे. यंदा आषाढ महिन्यातील अमावस्या बुधवार व गुरुवार अशी दोन दिवस विभागून आल्याने बहुतांशी नाशिककरांनी बुधवारीच गटारी अमावस्या साजरी केली. मासे, मटण, चिकण विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये तसेच हॉटेल, ढाब्यांवर खवैयांची गर्दी दिसून आली. यानिमित्त बाजारात विक्रीसाठी आलेले बोकड व कोंबड्यांची चढ्या भावाने विक्री सुरू होती.
श्रावणमासास प्रारंभ होत असल्याने तसेच अनेक कुटुंबांमध्ये गुरुवारी मांसाहार वर्ज्य असतो. त्यामुळे मांसाहार प्रेमींसाठी मंगळवार व बुधवार हे दोनच दिवस उरल्याने मांसाहारावर ताव मारला गेला. मांसाहार प्रेमींनी आखाडी हॉटेल-धाब्यांसह शहरालगतच्या शेत-शिवारे, फार्महाऊसवर मांसाहाराच्या जेवणावळींना प्राधान्य दिले होते. त्यासाठी मटन व चिकन विक्रीच्या दुकानांवर सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या.



(सर्व छायाचित्रे – अथर्व फोटोज्)
दिंडोरी रोडवरील मार्केट यार्ड परिसरात बोकड व कोंबड्या खरेदीसाठी गर्दी उसळली होती. पाच हजार ते पंचवीस हजारापर्यंत एका बोकाड्याची किंमत होती. कोंबड्यांची तीनशे ते नऊशे रुपयांपर्यंत विक्री केली जात होती. गावठी कोंबड्यांची खरेदी करण्यासाठी विशेष कल दिसून आला.

























