– पूर्व वैमनस्यातून घडली घटना…
पंचवटी – विशेष प्रतिनिधी
पेठरोडवरील फुलेनगर जवळील राहुल वाडी येथे सागर जाधव या युवकावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार करण्यात आला आल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री घडली आहे. गालातून घुसलेली गोळी मानेत अडकल्याने हा युवक गंभीर जखमी झाला आहे त्याला अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमी युवक सत्तारुढ पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा समर्थक असून पोलिसांनी बंदोबस्त मध्ये वाढ केली असून आरोपीच्या शोधार्थ पथक रवाना करण्यात आलेले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील पंचवटी परिसरामध्ये असलेल्या फुलेनगर जवळ राहुल वाडी हा परिसर आहे या ठिकाणी मंगळवारी रात्री सर्वसाधारण एक ते सव्वा वाजेच्या सुमारास या परिसरात राहणारा सागर विठ्ठल जाधव हा युवक परिसरात असलेल्या ओट्यावर इतर सहकाऱ्यांसोबत बसलेला होता.
या ठिकाणी पूर्व वैमनस्यातून परिसरात राहणारे विकी उत्तम वाघ आणि विकी विनोद वाघ या दोघांसह त्यांच्या अन्य साथीदारांनी या ठिकाणी येऊन सागर विठ्ठल जाधव यांच्यावर अचानक गोळीबार केला. या गोळीबारामध्ये सागर जाधव यांच्या गालातून गोळी ही आरपार गेली आहे तर दुसरी गोळी ही माने मध्ये अडकून पडल्यामुळे त्याची प्रकृती ही चिंताजनक आहे गोळीबार केल्यानंतर विकी उत्तम वाघ व विकी विनोद वाघ आणि त्यांचे साथीदार हे या ठिकाणावरून पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच परिसरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली पोलिसांनी तातडीने जखमी असलेल्या सागर विठ्ठल जाधव याला नातेवाईकांच्या मदतीने रुग्णालयामध्ये दाखल केले आले आहे. प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच तातडीने या ठिकाणी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त संगीता निकम, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील, सुनील पवार, सहाय्यक निरीक्षक शरद पाटील ,सचिन शिरसाट, व अन्य पोलीस कर्मचारी दाखल झाले असून या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी बंदोबस्त मध्ये वाढ करण्यात आली असून आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथक पाठविण्यात आलेले आहे. पंचवटी पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

























