पंचवटी – विशेष प्रतिनिधी
श्री काळाराम मंदीर पुर्व गेट समोर असलेल्या दुकानातून २१ हजार रुपये किंमतीची पितळी धातूची दीड फुट उंचीची महालक्ष्मीची देवीची मूर्ती चोरीला गेली होती. पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या बारा तासात आरोपीला जेरबंद करून मूर्ती हस्तगत केली आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, श्री काळाराम मंदिराजवळ नरेंद्र रमेश लहामगे (वय ३५, रा. बिडी कामगार नगर) यांचा देवांच्या मूर्ती विकण्याचा व्यवसाय आहे. या दुकानातून पितळी धातूची महालक्ष्मी देवीची मुर्ती चोरीला गेली होती. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पहाणी केली. तेव्हा यातील संशयित हा गंगाघाट परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून संशयित अन्सार रहीम अख्तर (वय ३६, रा हुसेन चौक, मनमाड) यास ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने चोरीची कबुली देताना पितळी मूर्ती पोलिसांच्या स्वाधीन केली.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त संगिता निकम, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक निरीक्षक सतिश शिरसाठ, सहायक उपनिरीक्षक संपत जाधव, हवालदार शिंदे, महेश नांदुर्डीकर, काळे, लोणारे, गायकवाड, कुणाल पचलोरे, अंकुश काळे, जयवंत लोणारे, परदेशी, बहिकर, वायंकडे, चितळकर, पवार, श्रीमती शिंदे यांनी ही कामगिरी बजावली आहे.

























