मुंबई – विशेष प्रतिनिधी
लातूर येथे छावा संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना लातूर येथे केलेल्या बेदम मारहाणीचे वळ अखेर राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या अंगावर उठले आहेत. या घटनेमुळे नाराज झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, ना. कोकाटे यांच्या संदर्भात पक्ष काय भूमिका घेतोय, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
विधीमंडळात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केल्याने राज्यात खळबळ उडाली होती. हे प्रकरण तापलेले असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रविवारी लातूर दौऱ्यावर होते. तिथे पत्रकार परिषद होत असताना ‘छावा’ संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील व सहकाऱ्यांनी तटकरे यांच्यासमोर पत्त्याचा कॕट टाकत ना. कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती. हे प्रकरण खा. तटकरे यांनी अतिशय संयमाने हाताळले. परंतू त्यानंतर घडलेल्या हाणामारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाविरुद्ध राज्यात जनक्षोभ उसळला.
राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी साथीदारांसमवेत विश्रामगृहातच छावाचे प्रदेशाध्यक्ष व सहकाऱ्यांवर हल्ला चढवला. यात प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील जबर जखमी झाले होते. हे दृश्य प्रसारमाध्यमाद्वारे राज्यात पसरले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. मराठवाड्यात तर ठिकठिकाणी तीव्र आंदोलने झाली. या घटनेमुळे खा. तटकरे हे सुद्धा तातडीने मुंबईला रवाना झाले. या घटनेची गंभीर दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजित पवार यांनी घेतली असून सूरज चव्हाण यांना युवक प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यास सांगितले आहे.


























