– नाशिक ग्रामीण ‘एलसीबी’ची कामगिरी…
नाशिक – विशेष प्रतिनिधी
सिन्नर माळेगाव औद्योगिक वसाहतीतील हिंद रेक्टीफायर कंपनीतून कॉपरची चोरी करणाऱ्या टोळीची उकल करण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. यातील दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून
सहा जण फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल रघुनाथ सोनार (वय ३८, रा. राणेनगर, बिंदीया पार्क, स्नेहलता अपार्टमेंट, नाशिक), ईस्माईल याकुब खान (वय ४५, रा. सोहरतगड, जि. सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश, हल्ली घोटी, ता. इगतपुरी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून त्यांच्याकडून १९७ किलो वजनाची कॉपर वायर तसेच गुन्हयात वापरलेली टाटा कंपनीची छोटा हत्ती गाडी असा एकूण ३,७८,८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. तर साथीदार ईरसाद उर्फ लंबु मसुद अली (रा. गोंदेफाटा, ता. इगतपुरी), संतोष उर्फ राहुल सोमा हिरवे, हर्षद दशरथ बेंडकोळी, रवि पगारे, वैभव दत्तु मुकणे, राहुल बोडके (सर्व रा. वाडीव-हे, ता. इगतपुरी) हे फरार आहेत.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, ११ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहत परिसरात हिंद रेक्टीफायर लिमीटेड कंपनीतील सिक्युरिटी गार्डला अज्ञात आरोपीतांनी चाकुचा धाक दाखवून मारहाणा करून, त्याचे हातपाय दोरीने बांधले. कंपनीचे टेस्टींग सेक्शनच्या गोडाऊन मधील कॉपर वायरच्या बॉबीन व ए.सी. साठी लागणारे कॉपरचे पाईप असे एकूण एक लाख २८ हजार रुपये किंमतीचा ३२० किलो कॉपर जबरीने चोरून नेला होता. याबाबत एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
औद्योगिक वसाहतीतील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी ग्रामीण जिल्हा अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी तात्काळ दखल घेतली व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शनपर सूचना केल्या. ‘एलसीबी’ चे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून, यातील आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी आरोपीतांचे सांगितलेले वर्णन यावरून गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली. तेव्हा इगतपुरी तालुक्यातील संशयितांनी हा गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने घोटी व नाशिक शहरातून संशयीतांना ताब्यात घेतले. दोघा संशयितांनी कंपनीतील सिक्युरीटी गार्डचे हातपाय दोरीने बांधून त्यास चाकूचा धाक दाखविला. तसेच मारहाण करून कंपनीतील गोडाऊनमधून कॉपरची चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्यावर यापूर्वी देखील मालाविरूध्द व शरिराविरुध्दचे गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, पोलीस अंमलदार प्रविण काकड, विनोद टिळे, संदिप कडाळे, सतिष घुटे, आबा पिसाळ, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांनी ही कामगिरी केली आहे.

























