नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहरातील औद्योगिक क्षेत्रात नावाजलेल्या महिंद्रा कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने ओडिशामधील बिजू जनता दलाच्या महिला खासदाराला बलात्कार व खुनाची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेने पंतप्रधानांसह विविध महनीय व्यक्ती तसेच महिंद्रा ग्रुपचे केशु महिंद्रा यांना टॅग करत ‘एक्स’ पोस्टद्वारे कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान महिंद्रा व्यवस्थापनाने यासंदर्भात कारवाईचे संकेत दिले आहेत.
बिजू जनता दलाच्या खासदार श्रीमती सुलता देव यांनी महिंद्रा कंपनीतील अधिकाऱ्याने केलेल्या पोस्टचे स्क्रीन शॉटही तक्रारीसोबत जोडले आहेत.
विशेष म्हणजे तो मुळचा ओडिशामधील असून नाशिकमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे.
या प्रकरणावर पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीत, असे खा. देव यांनी म्हटले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांना टॅग केले होते. आता महिंद्रा ग्रुपने यावर अधिकृत भूमिका मांडली आहे.

ओडिशातील पुरी जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात भाजल्यामुळे उपचार घेताना मृत्यू झाला होता. या पिडीत मुलीच्या जबाबाचा व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल झाला होता. या व्हिडिओच्या पोस्टवर महिला खासदाराने कमेंट केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने महिला खासदाराला बलात्कार व मारून टाकण्याची धमकी दिली होती. याबाबत महिंद्रा ग्रुपनेही आपली भूमिका ‘एक्स’ वर पोस्ट करताना ‘आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेत आहोत आणि तात्काळ चौकशी सुरु करत आहोत. जर आरोप खरे ठरले तर आमच्या आचारसंहिता नियमांनुसार कारवाई केली जाईल’, असे निवेदनात नमूद केले आहे.

























