– जलज शर्मा नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त
नाशिक – विशेष प्रतिनिधी
राज्यातील आयएएस दर्जाच्या सात अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आता नाशिकचे जिल्हाधिकारी असतील. तर पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची नाशिक कुंभमेळा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य शासनाने मंगळवारी या बदल्यांचे आदेश काढले. यात रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबईचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची जळगावच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईच्या शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कोलते यांची रिक्त पदावर पुण्याचे साखर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदाल यांची रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

























