– ग्रामीण सायबर पोलिसांची कामगिरी…
नाशिक – विशेष प्रतिनिधी
मालेगाव शहर येथील तक्रारदारास शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून तीस लाखांचा गंडा घालणाऱ्या दोघांना छत्रपती संभाजीनगर मध्ये जेरबंद करण्यात ग्रामीण पोलिसांच्या सायबर विभागाला यश आले आहे. दोघांकडून तीन लाख रुपयेही हस्तगत आले असून अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद दत्तात्रय गुळे (रा. टुनकी रोड, वरचा पाडा, पो. शिऊर ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजी नगर) व नयन युवराज वाघचौरे (रा. २७/२२६ प्रतापगड नगर एन ९ सिडको, जि. छत्रपती संभाजी नगर) अशी दोघा सायबर भामट्यांची नावे आहेत.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, मालेगाव शहर येथील तक्रारदारास शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सायबर भामट्यांनी सांगितलं. त्यांना अनोळखी मोबाईल नंबर वरून एसबीआय सिक्युरिटी यांचे वतीने शेअर मार्केट मध्ये कशा प्रकारे गुंतवणूक करायची आहे असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना एक व्हॉटसअप ग्रुप मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. नंतर त्यांना व्हॉटसअप ग्रुपव्दारे एका अॅपची लिंक पाठविली त्यांनी ती ओपन केली असता त्यांच्या मोबाईल मध्ये SBI INT (NUVA-INTL) या नावाचे ॲप डाउनलोड झाले. त्यानंतर त्यांना सायबर भामट्यांनी सांगितल्याप्रमाणे डाउनलोड केलेल्या ऍप्लीकेशन मध्ये गुंतवकूक करण्यास सांगत अधिक परतावा मिळून देतो असे आमिष दाखवले.
त्यानुसार वेळोवेळी त्यांनी अनेक बँक खात्यात सुमारे ३०,५८,९१६/- रूपये भरले. त्यांनी भरलेले पैशांची वेळोवेळी वाढ होत चालली होती असे या अॅप्लिकेशन मध्ये दिसत होते. एकूण ९५ लाख ०९ हजार २५८ रूपये वाढ झाल्याचे दिसून येत होते.
जेव्हा त्यांना ही रक्कम काढावी असे वाटले तेव्हा त्यांना सायबर भामट्यांनी तुमच्या प्रॉफिटच्या रक्कमेवर २०% रक्कम तुम्ही इन्कम टॅक्स करीता आमच्याकडे जमा करा, तेव्हा तुम्हाला ही रक्कम काढता येईल असे सांगितलं. यामुळे तक्रारदार यांना संशय आल्याने त्यांनी त्यांचे खाते असलेल्या एसबीआय बँकेत जावून चौकशी केली असता समजले की, फसवणूक झाली आहे. म्हणून त्यांनी सायबर पोलीस स्टेशन येथे गुरनं ०४/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९ (२),३ (५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (क) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला.
या गुन्हयाचा तपास नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मागदर्शनाखाली नाशिक ग्रामीण सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, उपनिरीक्षक दिगंबर थोरात, हवालदार प्रमोद जाधव, परिक्षीत निकम, तुषार खालकर, सुनील धोक्रट, विशाल चौधरी, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांनी करत गुन्हयातील आरोपी निष्पन्न केले. भामट्यांकडून तीन लाख रूपये तक्रारदार यांना परत मिळवून देण्यात आले आहेत.
फसवणूक झाल्यास संपर्क साधा !
नाशिक ग्रामीण जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपण अनोळखी फोन कॉल्सवर विश्वास ठेवून आपल्या बँक खात्याची वैयक्तीक माहिती अनोळखी व्यक्तीस देवू नये. कोणतीही बँक अशा प्रकारची माहिती फोनव्दारे विचारत नाही. बँक खात्याविषयी माहितीकरीता संबंधीत बँकेच्या शाखेत जावून खात्री करावी. तसेच फोनवर पाठविण्यात आलेल्या अनोळखी लिंक विषयी माहिती नसल्यास क्लिक करू नये. आपल्या बरोबर अशी कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास लागलीच जवळील पोलीस स्टेशनला किंवा सायबर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. तसेच ऑनलाईन तक्रारीकरीता १९३०, १९४५, १४४०७ यांना किंवा सायबर पोलीस स्टेशन कडील क्रमांक ०२५३-२२००४०८/७६६६३१२११२ यावर संपर्क करावा.

























