नाशिक – विशेष प्रतिनिधी
भांडी बाजारातील व्यापारी गिरीष दिनकर शेटे यांच्या दुकानातून गणपतीसह पाच मूर्ती चोरणाऱ्या तीन महिलांना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. संशयित महिला छत्रपती संभाजीनगर येथील असून सराईत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांना सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमनबाई सावळीराम जाधव (वय-५५), फुलाबाई शिवाजी गायकवाड (वय-३५), कमलबाई राधाकिसन जाधव (वय-४५) अशी तिघा महिलांची नावे असून तिघीही छत्रपती संभाजीनगर येथील मुकुंदवाडीतील संजयनगर मधील रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून चोरलेल्या गणपतीची एक व हत्तीच्या चार मुर्ती असा १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, बुधवारी (दि. २०) दुपारी चार वाजता शेटे यांच्या भांडी बाजारषयेथील दुकानातुन तीन अनोळखी महिलांनी एक गणपतीची व चार हत्तीच्या मूर्ती चोरून नेल्या होत्या. याबाबत त्यांनी सरकारवाडा पोलिसांकडे गुन्हा नोंदवला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पोहवा /९०० संदिप भांड यांना त्यांच्या गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने बातमी मिळाली की, या गुन्हयातील चोरीच्या मूर्ती घेवून तीन महिला बाहेरगावी जाण्यासाठी मेळा बसस्टॅन्ड येथे येणार आहेत. त्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर पथकाने सापळा रचून तिघींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चोरीचा मुद्देमाल मिळून आला.
पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, उपनिरीक्षक सुदाम सांगळे, हवालदार संदिप भांड, प्रशांत मरकड, प्रदिप म्हसदे, मिलींदसिंग परदेशी, नाझीमखान पठाण, विशाल देवरे, रुमेश कोळी, धनंजय शिंदे, जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख, गोरक्ष साबळे, शर्मिला कोकणी, मनिषा सरोदे, अनुजा येलवे, समाधान पवार यांनी ही कामगिरी केली आहे.

























