– गुंडा विरोधी पथकाने पाठलाग करून घेरले…
पंचवटी – प्रतिनिधी
पेठरोडवरील फुलेनगर मध्ये असलेल्या राहुलवाडी येथे सागर विठ्ठल जाधव (वय-३५) याच्यावर गोळीबार करत त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा प्रतिस्पर्धी टोळीचा म्होरक्या विकी वाघ अखेर गुंडाविरोधी पथकाच्या हाती लागला आहे. गोळीबार करून पळून गेलेला विकी अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर असा दुचाकीवरून प्रवास करत पोलिसांना चकवत होता. परंतू शनिवारी दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा ते कोशिंबे गाव असा पाठलाग करत त्यास जेरबंद करण्यात आले आहे. यामुळे पोलिसांच्या तपासाला वेग येणार आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, पेठरोडवरील राहुलवाडी (फुलेनगर) येथे १७ सप्टेंबरला रात्री उशिरा सागर विठ्ठल जाधव (वय ३५) या युवकावर गोळीबार झाला होता. या हल्ल्याला निकम व उघडे टोळीतील पूर्ववैमनस्य तसेच वर्चस्ववादाची किनार होती. यात जाधव हा गंभीर जखमी झाल्याने पंचवटी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. यातील १४ जणांना अद्यापपर्यंत अटक करण्यात आली होती. तर उर्वरीत फरारींचा शोध सुरू होता. या घटनेत प्रत्यक्ष गोळीबार करणारा म्होरक्या विकी उत्तम वाघ (वय-३४, रा. मायको दवाखान्याजवळ, पारस मेडीकलच्या बाजुला, फुले नगर) हा मात्र पोलिसांना चकवा देत होता.
गुंडा विरोधी पथक विकी वाघ याचा शोध घेत असताना तो गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीने अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर असा प्रवास करत असल्याची माहिती मिळाली. मात्र त्याचा निश्चित ठावठिकाणा मिळत नव्हता. अशातच पथकातील अंमलदार राजेश राठोड यांना विकी हा दिंडोरी तालुक्यातील वणी परिसरात येणार असल्याची ‘टीप’ मिळाली. त्यांनी याबाबत वरिष्ठांना कळवल्यानंतर कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार कारवाई करण्यात आली.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे, सुनिता कवडे यांनी ही संयुक्तरित्या कामगिरी बजावली आहे.
पाठलागानंतर लागला हाती….
म्होरक्या विकी वाघ वणी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुंडा विरोधी पथकाच्या दोन टीम तयार करून एक वणी गावात व दुसरी लखमापुर फाटा येथे सापळा लावुन थांबले. शनिवारी (दि.४) दुपारच्या सुमारास लखमापुर फाटयावरुन कोशिंबे गावाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याने विकी वाघ मोटार सायकलवर जोरात जातांना दिसला. त्यावेळी पोलीस पथकातील सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, कल्पेश जाधव यांनी त्यास पाठलाग करुन त्यास कोशिंबे गाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक येथे शिताफीने ताब्यात घेतले. त्याचे ताब्यातुन गुन्हयात फायरींग करतांना वापरलेले देशी बनावटीचे पिस्टल व बजाज पल्सर मोटार सायकल (एमएच १५ जेआर ८२१९) असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे.

























