नाशिक – विशेष प्रतिनिधी
कौटुंबिक वादातून संतप्त नवऱ्याने पत्नीसह सासू व साल्यावर कोयत्याने वार केल्याची खळबळजनक घटना भगूर येथे घडली. यात दोघे गंभीर जखमी असून देवळाली कॅम्प पोलिसांनी पतीसह चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन शांताराम भालेराव (वय ४५), शकुंतला शांताराम भालेराव (वय ५० वर्षे), शांताराम सिताराम भालेराव (वय ६५, तिघेही रा. पांढुर्ली ता.जि. नाशिक) व प्रेम पवार (वय ४२) अशी आरोपींची नावे आहेत.
प्रदिप संभाजी मोरे (वय ६०, धंदा. रा. आठवडे बाजार, भगुर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जावई नितीन शांताराम भालेराव रा. पांढुर्ली व पत्नी कामिनी यांच्यात किरकोळ भांडण होते. या रागातून मोरे यांच्या राहत्या घरासमोरील मिरची कांडकाचे दुकानासमोर प्रेम पवार व अभिजीत गाडगीळ (रा. पांढुर्ली) यांच्या सोबत येवून शिवीगाळ करून मुलगा प्रकाश यास जिवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याचे डोक्यावर, कपाळावर कानावर, छातीवर कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केली. तसेच मुलगी कामिनी व पत्नी रंजना यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर व किरकोळ दुखापत केली आहे. तसेच मुलीची सासु शकुंतला व सासरे शांताराम भालेराव यांनी मुलीस हाताने व लाथा बुक्क्यानी मारहाण केली. तर प्रेम पवार याने मोरे यांच्या तोंडावर हाताने बुक्का मारला. त्यानंतर जावई व त्याचा मित्र तेथून पळून गेले. उपनिरीक्षक देवरे तपास करत आहेत.

























