नाशिक – विशेष प्रतिनिधी
नाशिकमध्ये रविवारी (दिनांक १५ जून) ‘एमआरएफ टू व्हिलर रॅली ऑफ नाशिक’ ही राष्ट्रीय दुचाकी रॅली होत आहे. या रॅलीचे औपचारिक उदघाटन ‘एमआरएफ’ चे प्रदीप यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अमित वाघचौरे, अर्चना वाघचौरे, ‘एमआरएफ’ चे श्रीनिवासन उपस्थित होते. इंदोर पाठोपाठ नाशिकमध्ये या स्पर्धेला स्पर्धकांचा अतिशय उत्तम असा प्रतिसाद लाभला आहे. या स्पर्धेत एकूण ७० स्पर्धकांनी विक्रमी सहभाग नोंदवला असून त्या मध्ये तीन महिला स्पर्धकांचा सुद्धा समावेश आहे.
त्र्यंबकेश्वर नगरीपासून काही अंतरावर असलेल्या आंबोली ते हरसूल जवळच्या गावांमध्ये रविवारी स्पर्धा होणार असून शनिवारी सकाळी शिखरे फार्म्सच्या श्रीहरी लॉन्स अंबोली येथे या रॅलीत सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या कागदपत्रांची छाननी तसेच गाड्यांची स्पर्धापूर्व वाहन तपासणी घेण्यात आली. त्यानंतर सर्व स्पर्धकांचा जत्था स्पर्धात्मक मार्गाची पाहणी करून “श्रीहरी लॉन्स ” येथे परत आला. स्पर्धेतील वाहन धारकांना स्पर्धा संबंधित सूचना देण्यात आल्या.
शिखरे फार्म्स श्रीहरी लॉन्स आंबोली येथून सकाळी सव्वा सात वाजता राष्ट्रीय दुचाकी रॅलीला सुरुवात होणार आहे. नाशिकच्या एडब्लयू इव्हेंट्सच्या वतिने यंदाच्या हंगामातील शेवटच्या दोन फेऱ्यांपैकी मायभूमीत आणखी एक राष्ट्रीय अजिंक्यपदाची फेरी आयोजित करण्यासाठी सज्ज झाले आहे. एफएमएससीआयच्या मान्यताने ‘एमआरएफ मोग्रीप’, टीव्हीएस अपाचे आरटीआर, गॉडस्पीड रेसिंग, महेंद्र बच्छाव ग्रुपच्या आंबोली वीकेंड होम्स, गोदा श्रद्धा फौंडेशन आणि शिखरे फार्मच्या श्रीहरी लॉन्स या प्रयोजकांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
वेगवेगळ्या १० गटात रॅली रंगणार आहे. याही हंगामात महिलांचा स्वतंत्र गट सुरू करण्यात आला आहे. स्टार ऑफ महाराष्ट्र या राज्यभरातल्या खेळाडूंच्या गटाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धा रविवारी दि. १५ जून रोजी सकाळी ७ -१५ वाजता श्रीहरी लॉन्स येथून वाघेरा घाट मार्गे वीर नगर आडगाव देवळा फाटा च्या दिशेने रवाना होईल. प्रेक्षकांना विदेशी बनावटीच्या दुचाकी सोबतच स्कूटरच्या थरारक रायडिंगची लज्जत अनुभवायला मिळेल. सकाळी ८-१५ वाजता वीर नगर आडगाव देवळा फाटा येथून रॅलीचा स्पर्धात्मक प्रारंभ होईल. त्यामुळे प्रत्यक्ष रॅली मार्गावर जाऊन स्पर्धेचा आस्वाद घेण्याकरिता प्रेक्षकांना रॅली सुरू होण्याच्या एक तास अगोदर स्पर्धा मार्गावर प्रवेश दिला जाईल. त्यानंतर सर्वांकरिता स्पर्धा मार्ग बंद करण्यात येईल व पूर्णत: निर्मनूष्य केलेल्या रस्त्यावर स्पर्धा घेतली जाईल. या मार्गावर जनावरे व खासगी अशी कोणत्याही स्वरूपाची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार असून त्याकरिता कार्यकर्त्यांची मोठी फळी तैनात करण्यात आली आहे.
स्पर्धेदरम्यान कोणाला तातडीची वैद्यकीय मदत लागल्यास त्याकरिता तीन सुसज्ज रूग्णवाहिका तयार ठेवण्यात येणार आहे, त्यातील एका रूग्णवाहिकेत ट्रॉमा केअर यूनिट सज्ज असेल. स्पर्धेच्या दळणवळणाच्या व संचालनाच्या दृष्टीने रेडियो संपर्क यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. अशी माहिती रॅली चे ‘क्लार्क ऑफ कोर्स’ तथा ‘ए डब्लू इव्हेंट्स’ चे संस्थापक अमित वाघचौरे यांनी दिली आहे.
सदर स्पर्धेचा मार्ग त्र्यंबकेश्वर आणि हरसूल च्या दरम्यान वीरनगर – आडगाव देवळा फाटा – खरवळ – खरवळचा फणसपाडा फाटा – नांदगाव कोळी खरवळ फाटा – वरस विहीर – नांदगाव कोळी -हेदुलीपाडा दरम्यान असणार आहे. नंतर हे स्पर्धक हरसूल “अंबोली विकेंड होम” येथे सर्व्हिस साठी येतील, अशा पद्धतीने हा मार्ग स्पर्धक ३ वेळा पार पाडणार आहेत.

























