नाशिक – विशेष प्रतिनिधी
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या पावन उपस्थितीत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठामध्ये गुरुपौर्णिमा महोत्सवाला सात जुलैपासून अपूर्व उत्साहात प्रारंभ झाला. सेवामार्गातर्फे १२ जुलैपर्यंत उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

श्रीगुरुपीठ आणि प्रधान केंद्र दिंडोरी येथे देश- विदेशातील सेवेकर्यांची एकाच वेळी गर्दी होऊ नये याकरिता सेवामार्गातर्फे ७ ते १२ जुलै या दरम्यान गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. ७ जुलै रोजी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील सेवेकर्यांनी गुरुमाऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. ८ जुलै रोजी मराठवाडा विभाग, ९ जुलैला उत्तर महाराष्ट्र विभाग, ११ जुलै रोजी मुंबई आणि कोकण विभाग, तर १२ जुलै रोजी देशातील वेगवेगळ्या राज्यांसाठी आणि देश विदेशातील सेवेकर्यांसाठी गुरुपीठामध्ये दर्शन सोहळा होणार आहे.

नाशिक ते गुरुपीठ पायी दिंडीचे आयोजन..
गुरुपौर्णिमेनिमित्त नाशिक ते गुरुपीठ अशी पायी दिंडी काढण्यात येणार आहे. ही दिंडी नाशिक येथून ९ जुलै रोजी सकाळी सात वाजता सुरू होईल. सेवेकऱ्यांनी मोठ्या संख्येने या दिंडीत सहभागी होऊन आनंद लुटावा असे आवाहन करण्यात आले आहे.
हजारो सेवाकेंद्रांमध्ये १० जुलैला उत्सव…
सेवामार्गाच्या देश- विदेशातील हजारो सेवाकेंद्रांमध्ये गुरुवार दि.१० जुलै रोजी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सेवामार्गामध्ये कलियुगाचे चालक-मालक पालक परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांनाच गुरुस्थानी मानून त्यांचे पूजन करण्याची परंपरा आहे. कोट्यवधी सेवेकरी या दिवशी श्री स्वामी महाराज व परमपूज्य गुरुमाऊली यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या चरणी नतमस्तक होतात. ७ जुलै रोजी गुरुपीठ येथे झालेल्या दर्शन सोहळ्याला गुरुपुत्र चंद्रकांतदादा मोरे, नितीनभाऊ मोरे, आबासाहेब मोरे हेही उपस्थित होते.

























