नाशिक – विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रातील देवळाली व विदर्भातील रामटेक विधानसभा निवडणुकी संदर्भात खोटी माहिती प्रसारीत करणारे राजकीय विश्लेषक संजयकुमार यांच्याविरुद्ध सरकारवाडा तसेच नागपूरमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. संजयकुमार हे सेंट्रल फॉर द स्टडी अॉफ डेव्हलपिंग सोसायटीज् अर्थात ‘सीएसडीएस’ या संस्थेचे राजकीय विश्लेषक आहेत.
विधान सभा निवडणुकीसाठी देवळाली मतदार संघाच्या नायब तहासीलदार प्रविणा तडवी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संजयकुमार यांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात भिती निर्माण करून सार्वजनिक प्रशांततेविरुद्ध अपराध करण्यास प्रवृत्त होईल अशाप्रकारे जनतेमध्ये भिती निर्माण करण्याच्या उद्देशाने शासनाची तसेच निवडणूक आयोगाची बदनामी करण्याच्या उद्देशाने ट्विटर अकाउंटवरून खोटी माहिती प्रसारीत केली.

संजयकुमार यांनी १७ अॉगस्ट २०२५ रोजी रामटेक व नाशिकमधील देवळाली मतदारसंघात विधानसभा मतदार संघातील मतदार घटल्याचा दावा केला होता. १२६ देवळाली विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या वेळी ४,५६,०७२ मतदार होते. तर देवळाली विधानसभा मतदार संघ निवडणुकीत मतदार संख्या २,८८,१४१ असल्याचे पोस्ट करताना मतदार संख्या १,६७,९३६ म्हणजेच ३६.८२% घटल्याचा दावा केला होता. दरम्यान, संजयकुमार यांनी नंतर संबंधित पोस्ट डिलिट करत दिलगिरी व्यक्त केली होती. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

























