नाशिक – विशेष प्रतिनिधी
साडेतीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नाशिक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना गट-गण रचना निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत अंतिम गट-गण रचना राज्य निवडणूक आयोगाला सादर करावी, असे आदेश देण्यात आले असून, त्यानंतर आरक्षण निश्चिती आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासकीय राजवट संपुष्टात येऊन लोकप्रतिनिधींची निवड होणार असल्याने नागरिकांमध्येही उत्साह आहे. या निवडणुका नाशिकच्या ग्रामीण भागातील विकासाला गती देण्यास महत्त्वपूर्ण ठरणार असून, लवकरच निवडणूक कार्यक्रमाची घोषणा अपेक्षित आहे.
मार्च २०२२ मध्ये प्रस्तावित असलेल्या राज्यातील ३२ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यामुळे रखडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे २७% आरक्षण रद्द केले, कारण एकूण आरक्षण ५०% मर्यादेपेक्षा जास्त होत होते. यामुळे राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत निवडणुका पुढे ढकलल्या. परिणामी, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकरशाहीची प्रशासकीय राजवट लागू झाली. सर्वोच्च न्यायालयाने २०२२ पूर्वीच्या आरक्षण पद्धतीनुसार निवडणुका घेण्याचे आणि चार महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यात ७४ गट आणि १४८ गण निश्चित…
२०१७ च्या निवडणुकीत नाशिक जिल्हा परिषदेत ७३ गट आणि १४६ गण होते. ओझर आणि पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतींचे नगरपरिषदेत रूपांतर झाल्याने दोन गट कमी होऊन गटांची संख्या ७१ होईल, असा अंदाज होता. मात्र, ग्रामविकास विभागाच्या नवीन पत्रानुसार, नाशिक जिल्ह्यात ७४ गट आणि १४८ गण निश्चित करण्यात आले आहेत. मालेगाव, चांदवड आणि सुरगाणा तालुक्यांत प्रत्येकी एक गट आणि दोन गण वाढवण्यात आले. तर निफाड तालुक्यातील गटांची संख्या दोनने कमी होऊन ८, मालेगाव तालुक्यात ८, चांदवड तालुक्यात ५ आणि सुरगाणा तालुक्यात ४ गट निश्चित झाले आहेत.
————————————————————-
निवडणूक प्रक्रियेचे वेळापत्रक:
प्रारुप गट-गण रचना अधिसूचना – १४ जुलै २०२५ पर्यंत.
हरकती स्वीकारणे – २१ जुलै २०२५ पर्यंत.
विभागीय आयुक्तांना हरकती सादर: २८ जुलै २०२५ पर्यंत.
हरकतींवर सुनावणी – ११ ऑगस्ट २०२५ पर्यंत.
अंतिम गट-गण रचना सादर – १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत.

























