नाशिक – विशेष प्रतिनिधी
शिवभक्तांच्या श्रद्धेचा मानबिंदू असलेल्या श्री. कपालेश्वर मंदिर परिसरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न अद्याप जैसे-थे आहे. संंबधितांना
दिलेल्या नोटीसचा कालावधी संपून देखील कारवाई करण्यास महापालिकेचे विभागीय अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असून अतिक्रमणधारक याला पडद्यामागून मदत केली जातं असल्याने या प्रकरणात त्यांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा सुरु आहे.
श्री. कपालेश्वर मंदिरात नेहमीच दर्शनासाठी गर्दी असते. सध्या श्रावण मास सुरु असल्याने नाशिकच नव्हे तर राज्य व परराज्यातील भाविकही दर्शनासाठी येत आहेत. तसेच सिंहस्थ कुंभमेळा आता जवळच आहे. आगामी कुंभमेळ्यात गर्दीच्या दृष्टीने सदरील जागा श्री. कपालेश्वर संस्थान ने विकत घेतलेली आहे. परंतु सदरचे अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी तब्बल सव्वा वर्षांपासून जाणीवपूर्वक चालढकल सुरु आहे.
या अतिक्रमणाबाबत संंबंधिताला नगर नियोजन विभागातर्फे प्रथम २९ अॉगस्ट २०२४ ला प्रथम नोटीस बजावण्यात आली होती. तर आठ अॉक्टोबर २०२४ ला अंतिम नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर ३१ जुलै २०२५ ला खर्चाची नोटीस बजावून सात दिवसांची मुदत देत अतिक्रमण स्वतः काढून घ्यावे अथवा महापालिका कारवाई करत खर्च वसूल करेल, असा इशाराही देण्यात आला होता. मात्र हा कालावधी उलटूनही अद्यापपावेतो कोणतीही कारवाई झालेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या पंचवटी विभागाने ३१ जुलै २०२५ रोजी बजावलेल्या खर्चाच्या नोटीसीचा आशय पुढीलप्रमाणे….
उपरोक्त विषयांकित जागेवरील अनाधिकृत / अधिनियमांच्या विरुध्द बेकायदेशीर पणे केलले पत्रेशेड/बांधकाम/तारकंपाऊंड इ. बाबत आपणांस नगरनियोजन विभागामार्फत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनयमातील कलम २६०,२६१.२६४ व २६७ तरतुदीनुसार नोटिस बजाण्यात आलेली आहे.
सदर नोटिस नुसार आपण केलेले अनधिकृत पत्रेशेड/बांधकाम/तारकंपाऊंड इ. चे अतिक्रमण स्वतः हुन हटविण्यात यावे अन्यथा म.न.पा. मार्फत सदरचे अनधिकृत पन्नेशेड/बांधकाम/तारकंपाऊंड इ. चे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येईल आणि तसे करतांना येणाऱ्या सर्व खर्चाची, परिणामाची व नुकसानीची जबाबदारी संबंधितांवर राहील असे कळविण्यात आलेले होते.
तथापि, तद्नंतरही आपण सदरचे अनधिकृत / अधिनियमांच्या विरुध्द बेकायदेशीरपणे केलेले अतिक्रमण विहित मुदतीत काढून न घेतल्याने आपणांस या नोटिस अन्वये अंतीमतः सूचित करण्यात येते की विषयांकित जागेवरील अनधिकृतपणे विनापरवाना सुमारे १५.०० फुट x २५.०० फूट लोखंडी ऐंगल व पत्रे वापरुन बांधकाम वापर ही नोटीस मिळाल्यापासुन ७ दिवसांचे आत स्वतःहुन काढून घ्यावे किंवा सदर कारवाई करोता मनपाच्या होणारा १ दिवसाकरीता मुल्यांकनानुसार निष्कर्षणाचा खर्च रुपये ४९,७५३. पोलिस बंदोबस्त खर्च रुपये १९,९९४. आस्थापना व यंत्र साम्रगी खर्च रुपये १५,१८६. एकूण येणारा खर्च रुपये ८४.९३३ + जीएसटी इतका तातडीने विभागीय कार्यालय, पंचवटी मनपा खजिन्यात भरणा करून सदर पावती तात्काळ इकडील विभागाकडे सादर करावी.
तसे न केल्यास नाशिक महानगरपालिका कोणत्याही क्षणी, कोणतीही पूर्वसूचना न देता सदरचे अनधिकृतपणे विनापरवाना सुमारे १५,०० फुट x २५,०० फुट लोखंडी ऐंगल व पत्रे वापरुन वांधकाम वापर इ. काढून टाकेल व त्यापोटी होणारा खर्च र.रु. ८४.९३३/- + जीएसटी मात्र इतका महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांचे कलम ४७८ अन्वये वसल करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

























