पंचवटी – विशेष प्रतिनिधी
श्रावणमासा निमित्त देवदर्शन तसेच स्नानानिमित्त श्री. कपालेश्वर महादेव मंदिर तसेच रामकुंड परिसरात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेने गंगाघाट परिसरातील वाहतूकीच्या मार्गात बदल केले आहे. या आदेशान्वये श्रावणी सोमवार व शनिवारी गंगाघाटाकडे जाणाऱ्या चार प्रमुख मार्गावर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त चंद्रकांत पाडवी यांनी या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.
श्रावणात दर्शनासाठी श्री. कपालेश्वर तसेच विविध महादेव मंदिरात दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी होत असते. तसेच गोदास्नानासाठी रामकुंडावर आबालवृद्ध भाविक मोठ्या संख्येने येत असतात. या भाविकांना त्रास होऊ नये तसेच वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी गंगाघाटाकडे येणाऱ्या चार मार्गावर वाहतुकीचे निर्बंध जारी केले आहे.
मालेगाव स्टॅण्ड ते श्री कपालेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग, खांदवे सभागृह ते श्री कपालेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग, सरदार चौक ते श्री कपालेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग, ढिकले वाचनालय ते कपालेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग या रस्त्यांवर श्रावणातील चार सोमवार तसेच पाच शनिवारी सकाळी सहा ते रात्री १० वाजेदरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

























