नाशिक – विशेष प्रतिनिधी
संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर विश्वस्त मंडळाचा दोन वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या दिनांक २७ जून २०२५ रोजी पूर्ण झाला. त्यामुळे आज शनिवारी (दि. २८ जून) धर्मादाय सह आयुक्त यांच्या आदेशान्वये संस्थानचा कार्यभार प्रशासक विलास बी. पाटील यांच्याकडे सोपावण्यात आला. दोन वर्षांच्या कार्यकाळात विश्वस्त व कर्मचारी यांच्यात निर्माण झालेल्या जिव्हाळ्यामुळे निरोप घेतांना भावनिक वातावरण निर्माण झाले होते व सर्वांच्याच डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.
याप्रसंगी संस्थानचे विश्वस्त ॲड. अक्षय कलंत्री,
ॲड. प्रशांत जाधव, सौ. श्रद्धा दुसाने, सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी मंडलेश्वर काळे, रावसाहेब कोशिरे, श्रीकांत राठी, सुनील पटेल, तसेच व्यवस्थापक सुनील शिनगाण, कर्मचारी गोकुळ शेवाळे, आशा केदारे, कविता मांडगे, सखाराम बोखारे आदी उपस्थित होते. विश्वस्त मंडळाच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात संस्थानमध्ये अनेक चांगले निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

























