पंचवटी – विशेष प्रतिनिधी
मखमलाबाद ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या नागदेवतेच्या दर्शनाला मंगळवारी नागपंचमीला
मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पावसाने हजेरी लावली तरी तमा न बाळगता सुमारे एक लाख भाविकांनी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत तवली डोंगराच्या हिरवळीवर असलेल्या नागोबा नागनागेश्वरी तसेच मातेच्या, नागेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.
शहर आणि परिसरात ग्रामीण यात्रा भरत नाही परंतु मखमलाबाद परिसरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात यात्रा भरू लागली आहे. त्यामुळे यात्रेसाठी मखमलाबाद गावासह पंचक्रोशीतील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी यात्रेसाठी हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत नागोबाच्या दर्शनासाठी भाविकांची रांगा लागल्या होत्या.
गावापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या तवली टेकडीवरील अमृत उद्यानात असलेल्या नवसाला पावणाऱ्या जागृत नागोबा देवाच्या दर्शनासाठी सकाळपासून भाविकांनी गर्दी केली होती. यात्रा असल्याने गावात दुपारी बारा वाजेपर्यंत कोणत्याही घरात ‘तवा’ ठेवून स्वयंपाक करीत नाही. मात्र बारा वाजेनंतर स्वयंपाकास सुरुवात करून घरोघरी नागोबा देवतेसाठी पुरणपोळीचा नैवेद्य बनवितात.
सकाळी गावच्या यात्रेचा मान आदिवासी बांधवांचा असल्याने ग्रामविकास मंडळ सदस्य गंगाधर खोडे, माजी नगरसेवक नगरसेवक पुंडलिकराव खोडे यांच्या हस्ते ग्रामदैवत नागोबा नागनागेश्वरी मंदिराजवळ तसेच मनसा मातेच्या मंदिराजवळ नवीन ध्वज उभारण्यात आला. यावेळी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष भास्करराव पिंगळे, उपाध्यक्ष गंगाधर खोडे, सरचिटणीस मिलिंद मानकर, मदनशेठ पिंगळे, विष्णू काकड, आबासाहेब मुरकुटे, मोतीराम पिंगळे, वास्तुविशारद पंडित काकड, देवराम पवार, गंगाधर खोडे, बाबुराव रायकर, रमेश माळी राजेश शिरसाठ, हेमंत अंधृटकर गुरुजी, माजी नगरसेवक पुंडलिकराव खोडे, मविप्र संचालक रमेश पिंगळे, व्ही. एन नाईक संस्थेचे विश्वस्त नारायणराव काकड, व्ही. एन. नाईक संस्थेचे संचालक प्रल्हाद काकड, प्रमोद पालवे, विक्रम कडाळे, सेंट्रल गोदावरी संस्थेचे संचालक अनिल काकड आदींसह ग्रामविकास मंडळ सदस्य उपस्थित होते.

सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत दोन्ही मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. नागोबा मंदिरात महिलांनी पुरण पोळी दुधाचा नैवेद्य दाखवला. यात्रेनिमित्त गावात अनेक माहेरवाशींनी आल्या होत्या. अनेकांनी नवस तर अनेकांनी नवसपूर्तीही केली. यात्रेनिमित्त अनेक जुने मित्र मैत्रिणी एकमेकांना भेटताना दिसत होते. जुने मित्र जुन्या आठवणींना उजाळा देऊन यात्रेचा आनंद लुटताना दिसत होते. बालगोपाळांसह तरुण व वयोवृद्धांनीही यात्रेनिमित्त यात्रेचा मनसोक्त आनंद लुटला. बसस्थानकाकडून तवली डोंगराकडे जाणारा रस्ता भाविकांसह विविध खेळण्या, खाऊची दुकानांनी खचाखच भरलेला होता. बसस्थानक तसेच तवली डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर गावात अनेक व्यावसायिकांनी हातगाड्यांवर हॉटेल, खेळण्यांची दुकाने, सौंदर्य प्रसाधने, खाऊची दुकाने थाटली होती. यात्रेनिमित्त मखमलाबाद गावात लाखो रुपयांची उलाढाल झाली.

यात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी ग्रामस्थ तसेच मदनशेठ पिंगळे, माजी नगरसेवक दामोदर मानकर, मविप्र संचालक रमेश पिंगळे, व्ही. एन. नाईक संस्थेचे संचालक गोकुळ काकड, सेंट्रल गोदावरी संस्थेचे माजी सभापती अनिल काकड, बाळासाहेब पालवे, प्रभाकर पिंगळे, देविदास घाडगे आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यात्रोत्सवात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण सहायक निरीक्षक उमेश बोरसे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक पटारे ,मनोहर क्षीरसागर आदींसह कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

उद्यानाची देखभाल
पूर्वीचा तवली डोंगराचा विकास होऊन या ठिकाणी नाशिक महानगपालिका तसेच केंद्र अन् राज्य शासनाच्या वतीने अमृतवन उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. यात्रेच्या दिवशी कुठल्याही प्रकारे नुकसान होऊ नये म्हणून नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांसह उद्यानातील कर्मचारी संजय वाघ, दादा वाघ, विलास भोये, अनिल गोडगे, रोहिदास बरफ आदी देखभाल करत होते.
अमृतवन परिवाराच्या वतीने दर्शनाचे नियोजन
नागोबा मंदिराजवळ अमृतवन परिवाराच्या वतीने दर्शनाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी जयश्री गावित, सुनिता काकड, मीना बागुल मनिषा सानप, भारती भोये, सरला अहिरे, निर्मला निकम, कमल बागुल, पुष्पा पवार, यमुना भडांगे,सौ.खोटरे, राजश्री जाधव आदी महिलांनी उपस्थित होत्या.

























