– पहिल्याच दिवशी उसळली गर्दी…
नाशिक – विशेष प्रतिनिधी
दिवाळीच्या मंगलमय ‘स्व. सौ. सुरेखाताई भोसले सामाजिक प्रतिष्ठान’ च्या अध्यक्षा सौ. रश्मी सचिन भोसले आणि रविवार पेठ शिवसेनेच्या वतीने आयोजित ‘महोत्सव महिला उद्योजकांचा’ महोत्सवास थाटात प्रारंभ झाला आहे. पहिल्याच दिवशी या महोत्सवास नाशिककरांचा उदंड प्रतिसाद लाभला.
‘महिला उद्योजकांच्या महोत्सवाचे’ उद्घाटन गुरूवारी (दि. ९) शिवसेना उपनेते आणि जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. प्रभाग क्रमांक १३ मधील जुने नाशिक परिसरातील महिला उद्योजक आणि बचत गटांमुळे हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
महिला उद्योजकांना व्यासपीठ मिळावे यासाठी रविवार कारंजा या मध्यवर्ती ठिकाणी दिवाळीच्या मंगलमय पर्वावर आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव ‘स्व. सौ. सुरेखाताई भोसले सामाजिक प्रतिष्ठान’ च्या अध्यक्षा सौ. रश्मी सचिन भोसले आणि रविवार पेठ शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. महिला बचत गट आणि महिला उद्योजकांना त्यांच्या दर्जेदार स्वदेशी उत्पादनांच्या विक्रीसाठी आणि व्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी हे एक मोठे व्यासपीठ ठरत आहे.

उद्घाटनप्रसंगी शिवसेना नगरसेवक सुदाम ढेमसे, शिवसेना पदाधिकारी आनंद फरताळे, अशोक शेठ वैश्य, रामदास बोंदार्डे, राहुल लोहिया, राजेंद्र सानप, पैलवान महाजन, मधुकर काळे, नंदू गांगुर्डे, जगदीश शेजवळ, गणेश वैश्य, राजेश गीते, ऋषिकेश कहाणे यांच्यासह जुने नाशिक परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
महिला सक्षमीकरणाचा निर्धार
कार्यक्रमाच्या आयोजिका सौ. रश्मी सचिन भोसले यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “महिलांमध्ये प्रचंड कला आणि कौशल्ये आहेत. त्यांना योग्य संधी मिळाल्यास त्या केवळ स्वतःच्या पायावर उभ्या राहणार नाहीत, तर अनेकांना रोजगार देऊ शकतील. हा महोत्सव त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे.” यावेळी त्यांनी भविष्यातही महिला सक्षमीकरणासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी विविध उपक्रम राबवत राहण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. नाशिककरांनी यशवंत मंडई, मोकळी जागा, रविवार कारंजा येथील या महोत्सवाला (दिनांक ०७ ते २५ ऑक्टोबर २०२५) भेट देऊन महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

























