– नाशिककरांसाठी ‘ठाकरे ब्रँड’ एकवटणार…
नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहरासह जिल्ह्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच शासनाला जाग आणण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावतीने शुक्रवारी (दि.१२) सकाळी ११ वाजता संयुक्त जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बी.डी.भालेकर मैदानापासून या मोर्चास प्रारंभ होणार असून विविध मार्गाने मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचतील.
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, उपजिल्हाप्रमुख केशव पोरजे, सचिव मसूद जिलानी, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, सुजाता डेरे, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार तसेच दोन्ही पक्षाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी मोर्चाचे नेतृत्व करणार असून या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन नाशिककरांना करण्यात आले आहे.
शहरात अलीकडेच उघडकीस आलेला हनी ट्रॅप स्कॅम, नाशिककरांची विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची होत असलेली अॉनलाईन फसवणूक, संकटात सापडलेला शेतकरी, अनाधिकृत सावकारी व फोफावलेले अवैध धंदे, तरूणाईला उद्धवस्त करणारे एम.डी सारख्या विविध अंमली पदार्थांची खुलेआम विक्री, कोयता गँगची वाढती दहशत, रोलेट-बिंगो यासारख्या अॉनलाईन जुगाराचा विळखा, महापालिकेतील भ्रष्ट्राचार, खड्डेमय रस्ते, कुंभमेळ्यासाठी होत असलेल्या कामातील अनागोंदी कारभार, महिला असुरक्षितता, कामगारांचे हिरावून घेतले जाणारे हक्क, वीज कंपनीचे खासगीकरण व स्मार्ट मीटर लादणे, युवकांना भेडसावणारा बेरोजगारीचा प्रश्न, प्रत्येक शासकीय विभागातील भ्रष्टाचार आदी प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काळे झेंडे घेऊन संयुक्त जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन नाशिककरांना करण्यात आले आहे.

























