पंचवटी – प्रतिनिधी
शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी घेतलेल्या कणखर भुमिकेचे पडसाद पाडव्यानिमित्त बुधवारी सायंकाळी पंचवटीत निघालेल्या हेल्यांच्या मिरवणुकीत उमटले. पोलिसांनी सराईत गुन्हेगार व समर्थकांसह वदवून घेतलेली ‘नाशिक जिल्हा…कायद्याचा बालेकिल्ला’ ही घोषणा पाठीवर रंगवलेला हेला विशेष आकर्षण ठरले.
दिवाळी पाडव्यानिमित्त पंचवटीतील विविध भागातून हेल्यांना सजवून मिरवणुकीद्वारे दिंडोरी रोडवरील बाजार समितीसमोर असलेल्या श्री. म्हसोबा महाराजांच्या दर्शनासाठी आणले जातात. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी होत असते. या मिरवणुकीतील हेल्यांच्या पाठीवर दरवर्षी विविध घोषणा रंगवलेल्या असतात. त्यात तत्कालीन ज्वलंत विषय तसेच सामाजिक घडामोडींचे प्रतिबिंब उमटत असते. त्यामुळे सध्या सर्वात चर्चेत असलेल्या ‘नाशिक जिल्हा …. कायद्याचा बालेकिल्ला !’ ही घोषणा प्रसिद्ध जिलेबी व्यावसायिक दिलीप वाघ यांच्या हेल्याच्या पाठीवर रंगवण्यात आली. हा हेला मिरवणुकीचे आकर्षण ठरला. यावेळी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते.
दिवाळीच्या बलिप्रतिपदेला, ‘इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो’ अशी प्रार्थना केली जाते, ज्यामध्ये ‘बळीचं राज्य’ हे समतावादी आदर्श राज्याचे प्रतीक मानले जाते. बलिप्रतिपदेला रेड्यांची मिरवणूक काढतात कारण रेडा हा यमाचे वाहन आहे आणि तो शक्तीचे प्रतीक मानला जातो. या परंपरेमध्ये, गवळी समाज हा रेड्यांना सजवून त्यांची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढतो.

























