पंचवटी – सुनील बुनगे
उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत निर्देश देण्यात आले होते. त्यास मुदतवाढ देऊन ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचेही आदेश काढले होते. परंतु जुन्या वाहनांना ही नंबरप्लेट बसविण्याचे काम कमी झाले झाल्याने नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार त्यास अंतिम मुदतवाढ देण्यात आली असून, १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली. परंतु अद्यापही २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या राज्यातील अनेक वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) नंबर प्लेट बसविणे बाकी असल्याने ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली असल्याचे प्रसिद्धिपत्रक परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भीमनवार यांनी काढले आहे.

परिवहन विभाग आयुक्त विवेक भीमनवार.
वाहनांच्या नंबरप्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट (उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी) बसविणे आवश्यक आहे. एक एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते. जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यासाठी संदर्भीय परिपत्रक क्र. ३ नुसार ‘एचएसआरपी’ न बसविणाऱ्या वाहन मालकांचे वाहन हस्तांतरण, कर्जबोजा चढविणे, कर्जबोजा उत्तरविणे इत्यादी कामांवर आधीच निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
यापुढे ‘एचएसआरपी’ बसविलेल्या वाहन मालकांच्या वाहनांची पुनर्नोदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण इत्यादी सर्व काम (योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण वगळून) थांबविण्यात येतील. तसेच वायुवेग पथकामार्फत वाहन तपासणीमध्ये जप्त केलेल्या वाहनांना ‘एचएसआरपी’ लावल्याशिवाय सोडण्यात येणार नाही. त्यामुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात या निर्णयाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. तसेच स्थानिक वाहन वितरक, ऑटोरिक्षा, टॅक्सी बस ट्रक संघटनांची बैठक घेऊन याबाबत सर्वांना अवगत करावे. ‘एचएसआरपी’
बसविण्याकरिता जनतेच्या काही तक्रारी असल्यास dytccomp.tpt-mh@gov.in या ई-मेल वर पाठविण्यात याव्या.
…. या कारणांमुळे दिली मुदतवाढ
– अनेक जुन्या वाहनांवर ‘एचएसआरपी’ बसविणे बाकी.
– शहरी भागामध्ये काही वाहन मालकांना पुढील महिन्यात ‘एचएसआरपी’ बसविण्याची अपॉइंटमेंट मिळाली.
– राज्यातील ग्रामीण भागात फिटमेन्ट केंद्र उघडण्यास उशीर झाला.
– राज्यातील काही फिटमेन्ट केंद्र बंद पडली असल्याचे निदर्शनास आले.
– लोकप्रतिनिधी व जनतेकडून ‘एचएसआरपी’
बसविण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी प्राप्त झाली.
… अन्यथा १ डिसेंबर २०२५ पासून वायुवेग पथकाद्वारे कारवाई
दि. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ‘एचएसआरपी’ बसविण्यासाठी दिनांक ३०.११.२०२५ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानंतर दि. १ डिसेंबर २०२५ पासून उच्च सुरक्षा नोंदणी पाटी न बसविणाऱ्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यानंतर ‘एचएसआरपी’ळ न बसविणाऱ्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तर दि.३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत ‘एचएसआरपी’ बसविण्यासाठी पुढील अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहन मालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही.

























