नाशिक – विशेष प्रतिनिधी
विश्वास को-ऑप. बँकेची प्रगतीशील वाटचाल सभासद व ग्राहकांच्या बळावर सुरू असून कॉर्पोरेट बँकिंगच्या युगात आधुनिक सेवा-सुविधा देण्यासाठी विश्वास बँक कटिबद्ध आहे. बँकेने ९४५ कोटींचा मिश्र व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला असून एक कोटींचा व्यवसाय नजिकच्या काळात निश्चितच पार करेल असा विश्वास आहे, असे प्रतिपादन विश्वास को-ऑप. बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास लिलावती जयदेव ठाकूर यांनी केले.
विश्वास को-ऑप. बँकेच्या १४ व्या शिवाजीनगर (सातपूर) व १५ व्या उपनगर (नाशिकरोड) या शाखांचा शुभारंभ सोमवारी (दि. २३) करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. शिवाजीनगर शाखा (शॉप नं. २ ते ४, सोनवणे हाईट्स, शिवाजीनगर बस स्टॉप जवळ, शिवाजीनगर, सातपूर) तर उपनगर शाखा – शॉप नं. ७ व ८, पुजा रेसिडेन्सी अपार्टमेंट-ई, शांती पार्क रोड, मातोश्रीनगर, उपनगर, नाशिकरोड) येथे सुरू करण्यात आली आहे.
विश्वास ठाकूर यांनी बँकेच्या २८ वर्षांच्या वाटचालीचा व प्रगतीशीलतेचा आढावा घेतला. ते पुढे म्हणाले की, सभासद व ग्राहकांच्या सहकार्याने सहकाराची मूलतत्वे पाळून विश्वास को-ऑप. बँकेची वाटचाल यशोशिखराकडे होत आहे. सहकार आणि सामाजिक जाणीव ह्या दोन गोष्टी बँक जाणीवपूर्वक जोपासत आहे. स्वच्छ व पारदर्शी कारभारामुळेच बँक सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरली आहे. तत्पर आणि विनम्र ग्राहकसेवेचे व्रत विश्वास को-ऑप. बँकेने कायम जोपासले आहे. त्यामुळे ग्राहकांना जोडणे हा एकप्रकारे बँकेचा सामाजिक बांधिलकीचाच भाग आहे.
कॉर्पोरेट व्हिजन आणि मिशनचा नागरी सहकारी बँकांनी स्वीकार करणे ही काळाची गरज आहे आणि ते विश्वास बँकेने स्वीकारले आहे, म्हणूनच गुणवत्तापूर्ण बँकिंगचा आदर्श विश्वास बँकेने टिकवून ठेवला आहे. अत्याधुनिक सेवा व पारदर्शक व्यवस्थापन बँकेच्या आधुनिक वाटचालीचे वैशिष्ट्य आहे. संस्थेचा उत्कर्ष हा एकप्रकारे समाजाचा उत्कर्ष असतो. त्यामुळेच सर्व थरातील जनतेपर्यंत परिणामकारक बँकिंग पोहोचवण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. सर्वांच्या सर्वोत्तम सकारात्मक प्रयत्नांतून बँकेची यशोशिखराकडे वाटचाल सुरु आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी व सेवाभावी वृत्तीने विश्वास बँक काम करत आहे, असेही विश्वास ठाकूर म्हणाले.
विश्वास बँकेच्या ३१ मार्च २०२५ अखेर एकूण ठेवी रु. ५७२ कोटी ७५ लाख झाल्या असून कर्ज वाटप रु. ३७२ कोटी ०३ लाख व सीडी रेशो ६४. ९६% इतका आहे. बँकेचा एकूण व्यवसाय रु. ९४४ कोटी ७८.लाखांपर्यंत पोहोचला आहे. बँकेला ढोबळ नफा सात कोटी ५६ लाख व निव्वळ नफा रु. चार कोटी १४ लाख झालेला आहे. बँकेचे भागभांडवल रु. १८ कोटी ४९ लाख असून सभासद संख्या नऊ हजार ९८३ इतकी आहे, बँकेचा निधी रु. ३८ कोटी ७५ लाख, गुंतवणूक रु. १९३ कोटी २१ लाख, थकबाकी वसुली ९८.१६, ग्रॉस एनपीए ३.८४%, नेट एनपीए २.०९ % सीआरएआर १५.३० % तर खेळते भांडवल रु. ६३५ कोटी ०१ लाख इतके आहे.
विश्वास को-ऑप. बँकेतर्फे ग्राहकांना कोअर बँकिंग, मोबाईल बँकिंग, आर.टी.जी.एस./एन.ई.एफ.टी., स्टेटमेंट ऑन ई-मेल, फ्रँकिंग, लॉकर्स, वीज बिल, टेलिफोन बिल, किशोर विश्व योजना, आधार लिंक बचत खाते उघडण्याची सुविधा, क्युआर कोड, डेली कलेक्शन, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आदी सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शिवाजीनगर (सातपूर) व उपनगर (नाशिकरोड) या शाखांच्या शुभारंभाप्रसंगी मानद कार्यकारी संचालक मंगेश पंचाक्षरी, जनसंपर्क संचालक घनश्याम येवला, संचालक विलास हावरे, सौ. मंगला कमोद, सौ. वैशाली होळकर, कैलास पाटील, माजी संचालक डॉ. कैलास कमोद, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सारिका देशपांडे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश बागुल, शाखाधिकारी प्रणिता कुलकर्णी तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

























