नाशिक – विशेष प्रतिनिधी
इंदिरानगर परिसरातील विस्कळीत व कमी दाबाने होणार पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरावस्था, डासांचा प्रादुर्भाव आदी प्रश्नांसंदर्भात आमदार प्रा. देवयानी फरांदे, माजी नगरसेवक अजिंक्य साने यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेतली. या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करण्याचे व उपाययोजना करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले आहेत.
इंदिरानगर परिसरातील विस्कळीत व कमी दाबाने होणार पाणीपुरवठा, जॉगिंग ट्रॅक-साईनाथ नगर, विस्टा सोसायटी-अशोका हॉस्पिटल, जॉगिंग ट्रॅक-चार्वाक चौक-१०० फुटी रस्ता, सुखदेव शाळा परिसर, मोदकेश्वर सोसायटी व परिसरातील विविध कॉलनी रस्त्यांची झालेली दुरावस्था, अतिक्रमण, जाखडी नगर ते सिटी गार्डन येथील पावसाळी नाल्यांमधील दुर्गंधी व त्यामुळे होणारे डास आदी विविध नागरी समस्यांविषयी माजी नगरसेवक अजिंक्य साने यांनी नागरिकांसह भेट घेवून आ. प्रा. देवयानी फरांदे यांच्यासमवेत चर्चा केली.
विविध प्रश्नांचे गांभीर्य ओळखून आ.प्रा. देवयानी फरांदे यांनी तत्काळ नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आयुक्तांशी चर्चा केली. यावेळी आयुक्त मनीषा खत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ सदरचे प्रश्न सोडविण्याकामी अधीक्षक अभियंता रविंद्र धारणकर व शहर अभियंता संजय अग्रवाल यांना प्रत्यक्ष पाहणी करण्याचे व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रसंगी माजी नगरसेविका स्वातीताई भामरे, विनायक गीत, हेमंत मोडक, मोदकेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.दिलीप गुंजाळ, प्रकाश(आप्पा)कुलकर्णी, सुधीर रत्नपारखी, विस्टा सोसायटीचे सचिव श्री. भामरे साहेब, छबु काळे, भारत पंडित आदींसह नागरिक उपस्थित होते.

























