पालकांना मिळाला दिलासा….
पंचवटी : प्रतिनिधी
पंचवटी विभागाचे निर्भया पथक हिरावाडी परिसरात गस्त घालत असताना बहीण भाऊ घरी कोणालाही न सांगता निघून गेल्याची घटना समजली. त्यानंतर निर्भया पथकाने हिरावाडी परिसरातील बनारसी नगर भागात सीसीटीव्ही तपासणी करून सदर बालकांना त्यांच्या पालकांकडे सुखरूप सुपूर्त केल्याने पालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
याबाबतची अधिक माहिती अशी की पंचवटी पोलिसांचे निर्भया पथक हद्दीत हिरावाडी येथे गस्त घालत असताना रामदास पुंड(३६, रा. बनारसी नगर) यांनी निर्भया पथकाची भेट घेत त्यांची मुलगी आणि भावाचा मुलगा हे दुपारी साडेतीन ते चार वाजल्यापासून घरी कोणालाही न सांगता कुठेतरी निघून गेले असून आमची मदत करा, अशी विनवणी केली.
त्यानंतर निर्भया पथकाच्या पोलीस हवालदार मीना पवार, शितल महाले, चालक अंमलदार नागरे
यांनी बनारसी नगर हिरावाडी परिसरात जाऊन तेथील तीन ते चार ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज पाहून मुलांचा शोध घेतला. तेव्हा मुलं गार्डन मधून खेळून एका बिल्डिंगमध्ये गेल्याचे दिसले. त्यानंतर पथकाने त्या बिल्डिंगमध्ये जाऊन प्रत्येक घराचे दरवाजे वाजवून चौकशी करून मुलांचे फोटो दाखवून चौकशी केली. तेव्हा दोन्ही मुले इमारतीत मिळून आले. त्यांना तेथून घेऊन जात रामदास पुंड यांच्या घराजवळ जाऊन मुलीची आई दिपाली पुंड यांच्या ताब्यात सुखरूप दिले. या संदर्भातील माहिती पंचवटी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक नेमाने यांना देत स्टेशन डायरीत नोंद करण्यात आली.

























