– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना…
नाशिक – विशेष प्रतिनिधी
गुन्हयांचा तपास परिपूर्ण व गतिमान पध्दतीने होण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतली आहे. त्या अंतर्गत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलास प्राप्त झालेल्या नवीन अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅनचे उद्घाटन अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. गणरायाचे आगमन होत असताना पोलिसांच्या ताफ्यात दाखल होत असलेल्या या अत्याधुनिक वाहनामुळे तपासातील ‘विघ्न’ दूर होणार आहे.
आडगाव येथील पोलीस मुख्यालयात झालेल्या उद्घाटनप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय अधिकारी हरिष खेडकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा रविंद्र मगर, न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा नाशिक विभागाकडील फॉरेन्सिक एक्सपर्ट, तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

भारतीय न्याय संहितेच्या नवीन कायद्यानुसार गंभीर गुन्हयांच्या घटनास्थळांवर भेटी देण्यासाठी अत्याधुनिक सुविधांचा वापर करण्याबाबत सुधारणा करण्यात आली आहे. जिल्हयातील पोलीस ठाणे निहाय गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडल्यास सदर फॉरेन्सिक व्हॅन लागलीच घटनास्थळी जावून तपास यंत्रणेस भौतिक पुरावे गोळा करण्यासाठी मदत करणार आहे. न्यायसहायक वैज्ञानिक पथकाकडील वाहनात न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडील सहायक रासायनिक विश्लेषक हे त्यांचेकडील अत्याधुनिक किटसह हजर राहणार असून, फिंगर प्रिंट पथकाकडील अधिकारी देखील असणार आहे. तसेच सदर युनीटमधील वाहनात गुन्हयाच्या तपासकामी वैज्ञानिक व भौतिक पुरावा गोळा करणेकामी लागणारे अत्याधुनीक पध्दतीचे इन्व्हेस्टीगेशन किट साहीत्य ठेवण्यात आले आहे. या वाहनात फोटोग्राफर व प्रशिक्षीत कर्मचारी तसेच न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडील सहायक विश्लेषक असे हजर राहणार आहेत. त्यामुळे गुन्हा घडल्यावर गुन्हयाची उकल करण्यास तसेच आरोपीविरूध्द भौतिक, जैविक व वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यासाठी सदर पथकाची व मोबाईल फॉरेन्सीक वाहनाची विशेष मदत होणार असल्याचे मत यावेळी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले आहे.
—————————————————-
गुन्हे शाबित होण्याचे प्रमाण वाढणार !
सध्याच्या अत्याधुनिक विज्ञान युगात गुन्हेगार अत्याधुनिक पध्दतीचा वापर करून गुन्हे करतात. त्यामुळे गुन्हयाची उकल करतांना तपास यंत्रणेस बरेच अडथळे पार करावे लागतात. तसेच गुन्हा उघडकीस आल्यावरही तपासात आरोपीविरूध्द ठोस पुरावे, शास्त्रीय पध्दतीचा वापर करून पुरावे संकलीत न केल्यास गुन्हेगार सहीसलामत न्यायालयातून निर्दोष सुटतात. त्यामुळे गुन्हे शाबितीच्या प्रमाणातही मोठया प्रमाणावर घसरण होत असते.पोलीस तपास पथकास गुन्हयाच्या तपासात गुन्हयाच्या घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून घटनास्थळावर आढळून येणारे बारीक सुक्ष्म पुरावे, तसेच न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडील रासायनिक तसेच जीवशास्त्र विश्लेषण, तांत्रीक विश्लेषण इत्यादी या सर्व व अनेक बाबींचा बारकाईने अभ्यास करून व तपासात पुराव्यांची साखळी जोडून आरोपीविरूध्द न्यायालयात खटला पाठविण्यात येतो. न्यायसहायक वैज्ञानिक तज्ञांच्या मार्फत बारकाईने घटनास्थळाची पाहणी केल्यास, शास्त्रीय पुरावा संकलीत करून गुन्हेगाराविरुध्द न्यायालयात ठोस वैज्ञानिक पुरावा सादर करण्यात येतो. गुन्हयाच्या तपासकामी सबळ भैतिक, जैविक पुरावे गोळा करणेकामी व लीफ्टींग, पॅकींग करण्यासाठी मोबाईल फॉरेन्सीक व्हॅनची आवश्यक त्या अत्याधुनिक साधनसामुग्रीसह आवश्यकता असते.


























