नाशिक – विशेष प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती, मुंबई आयोजित ‘नाट्यपरिषद करंडक’ या एकांकिका स्पर्धेची नाशिक केंद्रावरील प्राथमिक फेरी ही दिनांक २४ ऑगस्ट रोजी होणार आहे. या वेळी चिठ्ठी प्रक्रियेद्वारे प्राथमिक फेरीत सादर होणाऱ्या एकांकिकांच्या सादरीकरणाचा क्रम ठरविण्यात आला. नाशिक केंद्रावरून या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी झाले असून येत्या २४ ऑगस्टला सकाळी ८ वाजेपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत नाट्यपरिषद सभागृह, कालिदास कलामंदिर येथे ही प्राथमिक फेरी तालीम स्वरूपात होणार आहे.
या संदर्भात शुक्रवारी सायंकाळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखेच्या कार्यालयात एका सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक केंद्रासाठी नाट्यपरिषद, नाशिकचे अध्यक्ष प्रा. रविंद्र कदम आणि प्रमुख कार्यवाह सुनिल ढगे हे केंद्र प्रमुख असून श्री.विजय शिंगणे, श्री.चंद्रकांत जाडकर हे या स्पर्धेसाठी नाशिक केंद्राचे समन्वयक म्हणून काम पहात आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेला भरघोस असा प्रतिसाद मिळालेला असून राज्यातून सर्व केंद्र मिळून एकूण २५२ संघांनी या एकांकिका स्पर्धेत सहभाग नोंदविलेला आहे. सदर सहविचार सभेमध्ये केंद्र प्रमुख आणि समन्वयक यांनी नाट्यपरिषद करंडक एकांकिका स्पर्धेबाबत उपस्थित स्पर्धकांना, संघ प्रमुखांना सखोल माहिती दिली. स्पर्धेचे नियम समजावून सांगितले. सहभागी स्पर्धकांच्या शंकांचे निरसन करत मार्गदर्शन करण्यात आले. सदर सहविचार सभेला विनोद राठोड, पीयूष नाशिककर, विक्रम गवांदे, श्रीराम वाघमारे, स्वरूप बागुल, वंदन वेलदे, नचिकेत दीक्षित, शुभम धांडे, नकुल चौधरी, त्रिविक्रम चंद्रात्रे इत्यादी उपस्थित होते.
प्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या एकांकिका पुढील क्रमानुसार सादर होणार आहेत.
१. बी.वाय.के. कॉलेज ऑफ कॉमर्स, एकांकिका ‘कॅफे मेमेंटो’
२. ग्रीन रूम थिएटर, एकांकिका ‘झपूर्जा’
३. नम्रता कलाविष्कार, एकांकिका ‘पुरवणी दिवस’
४. विजिकिषा थिएटर, एकांकिका ‘ओल्या भिंती’
५. केटीएचएम महाविद्यालय, एकांकिका ‘सवारी भवानी चौकामधी’
६. शो मॅन क्रिएशन्स, एकांकिका ‘नेकेड अँड अफ्रेड’
७. दीपक मंडळ, एकांकिका ‘बॅलन्सशिट’
८. विगीता एन्टरटेन्मेंट, एकांकिका ‘ रंसुरी’
९. पी पी ॲक्टिंग अकॅडमी, एकांकिका ‘संगीत वात्सल्य’
१०. नाट्यरसिक, नाशिक एकांकिका ‘आनंद’
११. कल्ला गँग, एकांकिका ‘सेवेंथ हाऊस ऑफ नन’
१२. एस.एस.प्रॉडक्शन्स, एकांकिका ‘डिस्चार्ज’

























