पंचवटी – विशेष प्रतिनिधी
श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या कार्यकारिणी फलक लावण्यावरून दोन गटांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. तसेच गटांमध्ये बाचाबाची झाली. वाद इतका वाढला की परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत धरपकड केली.
पुरोहित संघाच्या गंगाघाटावरील कार्यालयाबाहेर कार्यकारिणीचा फलक लावण्याचा प्रयत्न केला जात असताना एका गटाने त्याला विरोध दर्शवला. यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. दोन्ही गटांचे सदस्य आणि पदाधिकारी आमने-सामने आले आणि बाचाबाचीला सुरुवात झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या संपूर्ण प्रकारामुळे पंचवटी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
गेल्या महिन्यात पाटीदार भवनमध्ये झालेल्या बैठकीत सतीश शुक्ल यांना हटवून चंद्रशेखर
पंचाक्षरी यांच्या नेतृत्वाखाली गंगा गोदावरी पुरोहित संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तेव्हापासून दोन्ही गटातील वाद मिटण्याऐवजी वाढतच असल्याचे दिसून येत आहे. त्यातच शनिवारी सायंकाळी सतीश शुक्ल यांच्या नेतृत्वाखाली रामसेतू पुलासमोरील यजुर्वेद मंदिरात पुरोहित संघाची सर्वसाधारण सभा पार पडली. या बैठकीत मागील सभेच्या इतिवृत्तासह आर्थिक वर्षातील जमा-खर्चास मंजुरी देण्यात आली. या वेळी संस्थेच्या लेखापरीक्षणासाठी सनदी लेखापालाची नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली. कार्यकारिणीतील श्री. पंचाक्षरी, शेखर शुक्ल व दीक्षित यांची नावे कमी करून नवीन पदाधिकारी नेमण्याचे अधिकार श्री. शुक्ल यांना देण्यात आले. मात्र आता हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहचल्याने चिघळण्याची शक्यता आहे.

























