नाशिक – विशेष प्रतिनिधी
पंढरपुरात चंद्रभागे तिरी सर्व संतांच्या दिंड्या आषाढी एकादशीच्या मंगलपर्वात आपल्या मायमाऊलीचे, विठुरायाचे दर्शन घेण्याकरता व्याकुळ झालेल्या असतानाच,संपूर्ण महाराष्ट्रात देखील हेच भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. गावागावात शहरा शहरात दिंडी स्वरूपात वारकरी, सर्वसामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी अशा समाजातील सर्व घटकांची वारी “जय जय विठ्ठल….श्री हरी विठ्ठल” असा जयघोष करून पांडुरंगाच्या मंदिरात सावळे सगुण दर्शन घेऊन कृतार्थ होण्यात दंग झाली आहे.
अशीच एक आगळीवेगळी वारी नाशिकमध्ये ‘संस्कृती नाशिक’ च्या माध्यमातून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आज उत्साहात, भक्तीमय वातावरणात आणि भक्तांच्या अलोट गर्दीत संपन्न झाली. ‘संस्कृती नाशिक’ चे अध्यक्ष शाहू महाराज खैरे यांच्या संकल्पनेतून या वारीचे आयोजन करण्यात आले होते. मैदानात असलेल्या मंचावर विठ्ठल मुखदर्शनाचा ३०×२० चा भव्य दिव्य फ्लेक्स उभारण्यात आला होता. वारी ठीक सात वाजता सुरू झाली. तत्पूर्वी आलेल्या मान्यवरांचे उपस्थित वारकऱ्यांचे, सायकलिस्ट ग्रुपचे ज्युडो व खो-खो विद्यार्थ्यांचे, भजनी मंडळाचे आणि मंचावर प्रत्यक्षात विठ्ठल रखुमाई रूप साकारलेल्या कलाकारांचे अध्यक्ष शाहू खैरे यांनी स्वागत केले आणि कार्यक्रमास सुरुवात झाली.

वारीच्या सुरुवातीला विठ्ठलाची प्रतिमा तसेच ज्ञानेश्वरी तुकारामाची गाथा एका सजवलेल्या पालखीत ठेवून करण खैरे व सौ. निकिता खैरे तसेच मान्यवरांच्या हस्ते त्याचे पूजन झाले. विठ्ठल आरती ने सर्व वातावरण पांडुरंग स्वरूप झाले. भजनी मंडळाच्या जयघोषात, वाद्यांच्या तालावर वारकरी रूप घेतलेल्या मुला मुलींचे आकर्षक असे नृत्य सादर झाले. त्यानंतर माऊली रिंगण सोहळा पार पडला. घोड्यावर हाती भगव्या पताका घेऊन मिरवणूक सुरू झाली..राम कृष्ण हरीच्या गजरात पालखी पुढे निघाली अन् हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात पंढरी साकारली.
दिंडीची फेरी पूर्ण झाल्यावर उपस्थित सर्व भक्तांना प्रसाद स्वरूपात साबुदाणा खिचडी, केळी, राजगिरा लाडू यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस व नाशिक वकील संघाचे अध्यक्ष नितीन ठाकरे यांनी मनोगतात अनोख्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. ‘संस्कृती नाशिकने अशा पद्धतीने आषाढी वारीचे अत्यंत नेटके असे नियोजन केले. याबद्दल बोलताना अध्यक्ष शाहू खैरे यांनी सांगितले की, अशा स्वरूपाची वारी या शहरांमध्ये प्रथमच साजरी होत आहे. यंदाचे हे पहिले वर्ष असल्याने तसेच पाऊस असल्याने मोठ्या स्वरूपात वारीचे नियोजन करणे शक्य नव्हते. परंतु यापुढे प्रत्येक वर्षी उत्तरोत्तर ही वारी मोठ्या स्वरूपात करण्याचा आमचा मानस आहे. जेणेकरून या शहराचे सांस्कृतिक, धार्मिक,.सामाजिक वातावरण सलोख्याचे राहील व युवा पिढीला आपली परंपरा कळावी आणि त्यांच्या मनावर आपल्या संस्कृतीतील संस्कार रुजावे यासाठी वारीचे आयोजन करण्यात आले आहे.
या वारी सोहळ्याला शरद आहेर, उद्योजक शैलेश कुटे, देवानंद बिरारी, नाशिक क्रिकेट असोसिएशनचे समीर रकटे, कॅप्टन आनंद देशपांडे, माजी उपमहापौर गुलाम शेख, ज्युडो प्रशिक्षक विजय पाटील, नाट्य परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम, गीतकार मिलिंद गांधी, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, अनिल कुलथे, योगेश रकटे, गायक मिलिंद यशोद, यतीन कुलकर्णी, सागर खैरे, अमर खैरे, करण खैरे तसेच संस्कृती नाशिकचे आणि हास्य जत्रा ग्रुपचे सर्व सदस्य यांच्यासह शेकडो भक्तगण उपस्थित होते.


























