नाशिक – विशेष प्रतिनिधी
शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असणाऱ्या रविवार कारंजावरील मोडकळीस आलेल्या यशवंत मंडईच्या पाडकामास येत्या दोन दिवसात सुरूवात होत आहे. या कामाचा कार्यारंभ आदेश महापालिकेने नुकताच काढला असून यामुळे मंडईच्या जागेवर बहुमजली वाहनतळ उभारण्याच्या दिशेने खऱ्या अर्थाने वाटचाल सुरू होत आहे. या वाहनतळामुळे रविवार पेठ, सराफ बाजार, कापड बाजार, मेनरोड परिसरातील व्यापारी व ग्राहकांचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा प्रश्न सुटणार आहे.
रविवार कारंजा परिसरातील नगरसेविका स्व. सुरेखाताई भोसले यांनी मोडकळीस आलेल्या यशवंत मंडईच्या जागेवर बहुमजली वाहनतळ उभारणीचे स्वप्न बघितले व त्यादृष्टीने वाटचाल सुरु केली. परंतू त्यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर हा प्रश्न रेंगाळण्याची भिती होती होती. परंतू सुपूत्र सचिन भोसले व स्नुषा रश्मी भोसले यांनी नेटाने या प्रकल्पाचा पाठपुरावा केला. या प्रयत्नांना आता मूर्त स्वरूप येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर रविवार कारंजा परिसर फक्त व्यापारी दृष्टिकोनातून नव्हे, तर नियोजनबद्ध शहरी विकासाच्या दृष्टीनेही एक उदाहरण म्हणून ओळखले जाईल.
रविवार कारंजा या नाशिकच्या हृदयस्थानी वसलेल्या पारंपरिक बाजारपेठेत सणासुदीच्या काळात हजारो पावले खरेदीसाठी आपली वाट शोधतात. सणवार असो वा आठवडी बाजार येथे नेहमीच ग्राहकांची वर्दळ असते. मात्र हीच वाढती गर्दी गेल्या काही वर्षांपासून येथील वाहतूक कोंडीचे कारण बनली होती. येथील अरुंद रस्ते, बेशिस्त पार्किंग आणि वाहनांची वाढती गर्दी यामुळे स्थानिक, व्यापारी, ग्राहक सगळेच त्रस्त झाले होते. ही समस्या ओळखून, त्या काळात माजी नगरसेविका स्व. सुरेखा भोसले यांनी दूरदृष्टी ठेऊन एक कल्पना मांडली. मोडकळीस आलेली यशवंत मंडई पाडून त्या जागी बहुमजली वाहनतळ उभारण्याची कल्पना. या पार्किंग कॉम्प्लेक्समुळे केवळ एका इमारतीचे पुनरुत्थान होणार नव्हते, तर संपूर्ण परिसराला नवसंजीवनी मिळणार होती. हीच दूरदृष्टी समोर ठेऊन त्यांनी या स्वप्नपूर्तीसाठी मोठा संघर्ष केला.
त्यांच्या पुढाकाराने या यशवंत मंडईचा समावेश स्मार्ट सिटी प्रकल्पात करण्यात आला. सुरुवातीस हा प्रकल्प ‘सार्वजनिक-खाजगी भागीदारी’ या तत्वावर राबवण्याचा प्रयत्न झाला. पण स्मार्ट सिटी कंपनीने व्यवहार्यता नाकारली. पुढे ‘बीओटी’ तत्वावर प्रकल्प साकारण्याचा प्रस्ताव आला व प्रकल्पाचा खर्च ७० कोटींवर पोहोचला, निविदा निघूनही कोणत्याही कंपनीने प्रतिसाद न दिल्याने अखेर महापालिकेने स्वतः वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र इथेच आणखी एक मोठा अडथळा निर्माण झाला आणि मंडईतील भाडेकरूंनी कोर्टात धाव घेतली. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झालं, ती धोकादायक असल्याचं स्पष्ट झालं. परंतु न्यायालयीन प्रक्रियेमुळे पाडकामाला परवानगी मिळत नव्हती.
अनेक कारणांमुळे हा प्रकल्प तब्बल सहा वर्ष रखडलेला होता. स्व. सुरेखाताईंच्या निधनानंतर, त्यांच्या स्वप्नाच्या पूर्णत्वासाठी पुढे आले त्यांचे सुपुत्र सचिन रमेश भोसले त्यांनी या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं.
महापालिका प्रशासन, स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी जाब विचारले, तत्कालीन पालकमंत्री ना. दादा भुसे यांच्यापर्यंत पत्रव्यवहार, प्रत्यक्ष भेटी, निवेदने दिली. “जोपर्यंत यशवंत मंडईच्या जागेवर वाहनतळ होत नाही, तोपर्यंत या परिसरात इतर कोणतेही काम होऊ देणार नाही” ही त्यांची ठाम भूमिका होती. हा सातत्यपूर्ण प्रयत्न आणि लोकाभिमुख संघर्ष शेवटी फळाला आला. न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला आणि तब्बल सहा वर्षांनंतर हा प्रकल्प आता पूर्णत्वास जात आहे.

























